लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच अमरावतीत निवडणूक गाजू आणि वाजू लागली असून अज्ञात लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आणि आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत कौर-राणा यांच्या वाहनाची काच फोडण्याचा प्रकार घडला, तर ‘सोशल मीडिया’वर नवनीत राणा यांच्या आक्षेपार्ह छायाचित्रांचा प्रसार सुरू झाल्याने राणा कुटुंबीय चांगलेच वैतागले आहेत. यासंदर्भात राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रारही नोंदवण्यात आली आहे.
येथील शंकर नगर परिसरात आमदार रवी राणा यांच्या निवासस्थानाबाहेर उभ्या असलेल्या एम.एच. ३१/ ई ए ९८०२ क्रमांकाच्या कारच्या मागील बाजूची काच फोडण्यात आल्याचे बुधवारी उघडकीस आले. कुणीतरी काच फोडून कारच्या आतही दगड भिरकावल्याचे युवा स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. या कार्यकर्त्यांनी राजापेठ पोलीस ठाण्यावर धाव घेतली. वाहनचालक बबलू मेश्राम यांच्या तक्रारीच्या आधारे राजापेठ पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. राजकीय विरोधकांचे हे काम असल्याचा आरोप युवा स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. अमरावती मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नवीत कौर-राणा यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ‘व्हॉट्स अ‍ॅप’, ‘फेसबूक’ यासारख्या सोशल मीडियातून प्रतिक्रियांचा पाऊस पडला, पण त्याच वेळी नवनीत राणा यांच्या आक्षेपार्ह छायाचित्रांची देवाण-घेवाणही सुरू झाली.
नवनीत कौर या चित्रपट अभिनेत्री आहेत. अनेक तेलगू चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या आहेत. इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या त्यांच्या छायाचित्रांना बीभत्स रूप देऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचा प्रसार करण्यात आला. या छायाचित्रांची जोरदार चर्चा मतदार संघात सुरू झाली. युवकांच्या मोबाईलवरून ही छायाचित्रे लगोलग पसरली. आमदार रवी राणा यांचे स्वीय सहायक विनोद गुहे यांनी यासंदर्भात राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. सोशल मीडियातून आक्षेपार्ह चित्रांचा प्रसार करण्यात येत असल्याने नवनीत राणा यांना मानसिक त्रास झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. नवनीत राणा यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न सुरू असून या कुरापती राजकीय विरोधकांच्या असल्याचा संशय तक्रारीतून व्यक्त करण्यात आला आहे. युवा स्वाभिमान संघटनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनीही या आक्षेपार्ह छायाचित्रांच्या प्रसाराबद्दल तीव्र रोष व्यक्त केला आहे. ही छायाचित्रे पसरवणाऱ्या समाजकंटकांच्या विरोधात कडक कारवाई केली जावी, अशी त्यांची मागणी आहे. नवनीत कौर-राणा यांच्यावर सोशल मीडियातून आक्षेपार्ह पद्धतीने प्रतिक्रिया टाकल्या जात आहेत. त्यामुळे राणा कुटुंबीय प्रचाराच्या पहिल्या टप्प्यातच त्रस्त झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा