राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना या पक्षांनी आपापल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. उमेदवारांची नावे जाहीर झाल्यावर वेगवेगळी चर्चा नेहमीच होते. नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे यासारख्या दिग्गजांची उमेदवारी जाहीर झाली तरी राजकीय वर्तुळात चर्चा मात्र राष्ट्रवादीच्या अमरावती मतदारसंघातील उमेदवार नवनीत कौर राणा यांच्याबाबत सुरू आहे. हिंदी तसेच दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये भूमिका केलेल्या नवनीत कौर यांच्या जात प्रमाणपत्राबाबत गोंधळ आहे. दक्षता आयोगाने त्यांच्या जात प्रमाणपत्राला आक्षेप घेतला आहे. आता तर मुलुंडमधील न्यायालयाने खोटय़ा जात प्रमाणपत्रावरून कौर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे. जात प्रमाणपत्राचा गोंधळ असतानाच सध्या सोशल मिडियामधून नवनीत कौर यांची फिरणारी छायाचित्रे हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. दाक्षिणात्य चित्रपटांमधील त्यांची भूमिका असलेली छायाचित्रे सध्या राज्यातील बहुतेक सर्वच राजकारण्यांच्या मोबाईलमधील वॉटस्अप येत आहेत. वेगवेगळ्या वेषातील त्यांच्या छायाचित्रांची दररोज भर पडत आहे. कोण या नवनीत कौर, असा प्रश्न राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पडला. अमरावतीमधील बडनेरा मतदारसंघाचे अपक्ष आमदार रवि राणा यांच्या त्या पत्नी. हे राणा महाशय योगगुरु पातांजलीचे रामदेव बाबा यांचे पट्टशिष्य. विधान भवनात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सतत पुढेपुढे करण्यासाठी राणा प्रसिद्ध. अमरावती मतदारसंघ काँग्रेसला मिळावा म्हणून त्यांचे प्रयत्न सुरू होते. पण हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडेच राहिला आणि राणा यांनी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला काय मोहिनी घातली हे कोण जाणे, पण पक्षाने त्यांच्या पत्नीच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. राणा यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी विरोध केला, पण पक्ष नेतृत्व कोणाच्याच विरोधाला जुमानत नाही. नवनीत कौर याच पक्षाच्या उमेदवार असतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारीच स्पष्ट केले. एवढे सारे होऊनही नवनीत कौर यांचे पक्षाकडून केले जाणारे समर्थन लक्षात घेऊन राणा नव्हे तर त्या राष्ट्रवादीच्या राणी ठरल्याची चर्चा होऊ लागली आहे.
राष्ट्रवादीची राणी !
राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना या पक्षांनी आपापल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. उमेदवारांची नावे जाहीर झाल्यावर वेगवेगळी चर्चा नेहमीच होते.
First published on: 07-03-2014 at 03:49 IST
TOPICSराष्ट्रवादी काँग्रेस पक्षNCPलोकसभाLoksabhaलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Electionलोकसभा पोल २०२४Lok Sabha Pollsसंसदीय निवडणुकाParliament Election
+ 1 More
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp queen navneet kaur