आर. आर. आबांच्या स्थानिक राजकारणाला कंटाळल्याचे कारण देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानपरिषदेतील आमदार संजय पाटील मंगळवारी भाजपमध्ये दाखल झाले, आणि अगदी सुटकेचा श्वास सोडल्यासारखे मोकळेपणाने बोलू लागले. राष्ट्रवादी काँग्रेसमधील आजी-माजी आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य भाजपमध्ये येऊ लागल्याने गोपीनाथ मुंडे भलतेच खुशीत आहेत. मागच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारल्याने पक्ष सोडलेले गुहागरचे विनय नातूही स्वगृही आले. भाजपकडे नेत्यांचा ओघ सुरू झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात अधिकच आक्रमक झालेले गोपीनाथ मुंडे आता प्रदेश भाजपवरील आपली पकडही मजबूत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. संजय पाटील यांच्यासारखा आक्रमक नेता भाजपमध्ये आणण्यासाठी मुंडे यांनी दीर्घकाळ प्रयत्न केले. खरं म्हणजे, पाटील हे मूळचे शरद पवारनिष्ठ. पण ‘दमदार’ गृहमंत्री आर.आर. पाटील यांना त्यांच्या सांगलीतच संजय पाटील यांनी कडवा विरोध केल्याच्या भावनेने गृहमंत्री त्यांच्यामागे हात धुवून लागले. संजय पाटील यांनी पक्षश्रेष्ठींपर्यंत तक्रारी करून पाहिल्या, पण काहीच झाले नाही. पक्षात त्यांची घुसमट वाढतच चालली आणि त्यांच्यावर राजकीय दबाव वाढला. त्यामुळे अखेर त्यांनी भाजपची वाट धरली. संजय पाटील यांचा भाजप प्रवेश तर झाला. पण भाजपमध्येही काहींची घुसमट होत आहे, काहीजण मुंडे यांच्यासारख्या ‘वजनदार’ नेत्यांच्या दबावाखाली आहेत. त्यामुळे कोणाला संधी मिळत नाही, तर कोणाची उमेदवारीची तिकीटे ऐनवेळी कापली जातात. राष्ट्रवादीत ज्यांची घुसमट होते, त्यांची सुटका होण्याचा मार्ग भाजपमधून जातो, मात्र भाजपमध्येही दबावाखाली व घुसमट होत असलेल्या नेत्यांचे काय? त्यांची सुटका कधी होणार? त्याचा मार्ग काय असेल? अशीही चर्चा भाजपमधील काही नेते व कार्यकर्ते करू लागले आहेत.
कुणाची सुटका, कुणाची घुसमट
आर. आर. आबांच्या स्थानिक राजकारणाला कंटाळल्याचे कारण देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानपरिषदेतील आमदार संजय पाटील मंगळवारी भाजपमध्ये दाखल झाले
First published on: 27-02-2014 at 04:48 IST
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp r r patil ncp mla sanjay patil