कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आले तरी राणे यांचा प्रचार न करण्याचा निर्धार सिंधुदुर्गातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
सिंधुदुर्गात उद्योगमंत्री नारायण राणे यांनी गेली काही वष्रे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगर परिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य फोडले असल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे. तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या कामांमध्ये जाणीवपूर्वक अडथळे आणले जात असल्याची तक्रार आहे. या प्रकारांमुळे यंदाच्या निवडणुकीत निलेश राणे यांच्या प्रचारापासून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दूर राहिले आहेत.
.तर कल्याणमध्ये आनंद परांजपेंवर बहिष्कार
डोंबिवली:राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सिंधुदुर्गमध्ये नीलेश राणे यांना साहाय्य करणार नसतील तर, सर्व कोकणवासीय लोकप्रतिनिधी, मतदार कल्याण मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आनंद परांजपे यांच्यावर बहिष्कार टाकतील, असा इशारा अखिल भारतीय कोकण महासंघाच्या मेळाव्यात देण्यात आला.
जैतापूर परिसरातील मच्छिमारांची राणेंना ‘प्रवेश बंदी’
 जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प परिसरातील मच्छिमारांच्या विरोधाची गंभीर दखल न घेतल्याबद्दल उद्योगमंत्री नारायण राणे यांना बुधवारी तेथे नियोजित सभा रद्द करावी लागली.  जैतापूर प्रकल्पाच्या विरोधात स्थापन झालेल्या जनहक्क समितीचे उपाध्यक्ष उस्मानभाई सोलकर म्हणाले की, या समुद्रावर आमची उपजीविका अवलंबून आहे. त्यामुळे प्रकल्पाचा पुरस्कार करणाऱ्या कोणालाही पाठिंबा देणार नाही.