लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील चित्र काय राहील, भाजप-शिवसेना युती बाजी मारेल की काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा वरचष्मा असेल याबाबत उत्सुकता असताना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये मात्र वेगळीच चढाओढ लागली आहे. काँग्रेसच्या जागा कमी व्हाव्यात यासाठी राष्ट्रवादीतून पद्धतशीर प्रयत्न सुरू असल्याची भीती काँग्रेसच्या गोटात व्यक्त होत आहे.
नरेंद्र मोदी यांच्या प्रभावामुळे राज्याच्या शहरी भागांमधील मतदारसंघात परिणाम होईल, अशी शक्यता सत्ताधारी गोटात व्यक्त करण्यात येत आहे. यातूनच सत्ताधाऱ्यांनी ग्रामीण भागांमधील मतदारसंघांवर अधिक लक्ष केंद्रित केले. गेल्या वेळी काँग्रेसने १७ तर राष्ट्रवादीने आठ जागा जिंकल्या होत्या. या वेळी त्या तुलनेत जास्त जागा मिळतील, असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. मात्र यंदा कोणत्याही परिस्थितीत दोन अंकी जागा जिंकयाच्याच हा निर्धार राष्ट्रवादीने केला आहे. जास्तीत जास्त जागा जिंकण्याकरिता राष्ट्रवादीने त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत.
यंदा सत्ताधाऱ्यांसाठी वातावरण तितकेसे अनुकूल नाही. विशेषत: विदर्भ आणि मराठवाडय़ात भाजप-शिवसेनेला चांगले यश मिळेल, अशी शक्यता आहे. राष्ट्रवादीने गत वेळी जिंकलेल्या जागांबरोबरच गेल्या वेळी पराभूत झालेल्या मतदारसंघांमध्ये जोर लावला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील शिरुर, मावळ, कोल्हापूर, नगर या ठिकाणी जास्त लक्ष घातले आहे. गेल्या वेळी जिंकलेल्या सर्वच जागा कायम राखणे शक्य झाले नाही तरी नव्याने जागाजिंकण्याचे राष्ट्रवादीचे उद्दिष्ट आहे. राष्ट्रवादीला सर्वाधिक चांगले यश यंदाच्या निवडणुकीत मिळेल, असा विश्वास राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.
काँग्रेसचे गत वेळी १७ खासदार निवडून आले होते. मनसेच्या मतविभाजनामुळे मुंबईतील पाचपैकी चार जागा जिंकणे काँग्रेसला शक्य झाले होते. देशातच काँग्रेसच्या विरोधात वातावरण असल्याने त्याचा फटका राज्यातही काँग्रेसला बसणार आहे. नंदुरबार आणि सांगली हे राज्यातील काँग्रेसचे पारंपरिक मतदारसंघ यंदा अडचणीत आहेत.
काँग्रेसची सारी मदार मुंबई आणि विदर्भावर असताना विदर्भात वातावरण तेवढे अनुकूल नाही, तर मुंबईत मोदी घटकामुळे मनसेचा फारसा उपयोग होणार नाही, असा पक्षात मतप्रवाह आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीत पहिल्यांदाच एकवाक्यता असल्याचे मुख्यमंत्री म्हणत असले तरी सिंधुदुर्ग, लातूर, नंदुरबार, सांगली, यवतमाळ मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी आतून विरोधकांना मदत करीत असल्याचे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. राष्ट्रवादीचे काँग्रेसपेक्षा जास्त खासदार निवडून आल्यास आगामी निवडणुकीत काँग्रेसला ते त्रासदायक ठरू शकते. मात्र २६ जागा लढविणाऱ्या काँग्रेसचे राज्यात सर्वाधिक खासदार निवडून येतील यावर प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे ठाम आहेत.
काँग्रेसच्या जागा पाडण्याचे राष्ट्रवादीचे प्रयत्न?
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील चित्र काय राहील, भाजप-शिवसेना युती बाजी मारेल की काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा वरचष्मा असेल याबाबत उत्सुकता असताना,
First published on: 09-04-2014 at 01:44 IST
TOPICSकाँग्रेसCongressराष्ट्रवादी काँग्रेस पक्षNCPलोकसभाLoksabhaलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Electionलोकसभा पोल २०२४Lok Sabha Pollsसंसदीय निवडणुकाParliament Election
+ 2 More
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp use systematic way to beat congress candidates