ज्येष्ठ भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या बीड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक त्यांच्या कुटुंबियांपैकी कोणीही लढविल्यास राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्याविरोधात उमेदवार उभा करणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी येथे जाहीर केले.
मुंडे यांना आदरांजली वाहण्यासाठी मुंबई भाजपतर्फे एनसीपीएमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले, राजू शेट्टी, महादेव जानकर, आदी सर्वपक्षीय नेते, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, पियूष गोयल, रावसाहेब दानवे,  उपस्थित होते. मुंडे-महाजन कुटुंबियांपैकी पंकजा मुंडे-पालवे, पूनम महाजन व अन्य सदस्य शोकसभेस उपस्थित होते.
मुंडे कुटुंबियांपैकी कोणीही निवडणूक लढविल्यास त्यांची निवड बिनविरोध व्हावी, असा प्रयत्न राहील, असेही पवार यांनी सांगितले. मुंडे यांचे ‘घडय़ाळ’ाशी कधीही जमले नाही, मग ते वेळ दाखविणारे घडय़ाळ असो की राष्ट्रवादीचे. त्यांनी नेहमी राज्यहिताची भूमिका घेतली. ते दिलदार होते. ऊस कामगारांचे नेतृत्व करताना शेतकरीही टिकला पाहिजे, अशी त्यांची समन्वयाची भूमिका होती. कुठेही उशिरा जाणारे मुंडे मृत्यूला मात्र अतिशय घाईने सामोरे गेले, याबद्दल खेद वाटतो, अशा भावना पवार यांनी व्यक्त केल्या.
गरीब, शोषित आणि तळागाळातील समाजाच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या मुंडे यांचा राजकीय वारसा पंकजा मुंडे या समर्थपणे पुढे नेतील व त्यांची पोकळी भरून काढतील, असा विश्वास व्यक्त करीत राजनाथसिंह यांनी नियतीने क्रूरपणे मुंडे यांना हिरावून घेतल्याबद्दल दुख व्यक्त केले.
 मुंडे-महाजन कुटुंबाशी ठाकरे कुटुंबियांचे नेहमीच जिव्हाळ्याचे संबंध होते. कोणत्याही अडचणीत पंकजा यांच्यामागे मी भाऊ म्हणून उभा राहीन, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली.