नेत्याच्या निधनानंतर त्याच्या समर्थकांना कोणी वाली राहात नाही याची प्रचिती सध्या माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या गटातील कार्यकर्त्यांना येत आहे. देशमुख यांच्या गटातील दोन विद्यमान खासदार आणि विधान परिषदेच्या एका आमदाराला पक्षाने उमेदवारी नाकारली तर अन्य काही नेत्यांना आपली पदे गमवावी लागली.
लोकसभेचे उमेदवार निश्चित करताना काँग्रेसने गडचिरोली-चिमूरचे विद्यमान खासदार मारोतीराव कोवासे आणि भिवंडीचे सुरेश टावरे या दोघांना उमेदवारी नाकारली. दोघेही विलासराव देशमुख यांच्या गटातील मानले जायचे. या दोन्ही खासदारांना गेल्या वेळी विलासरावांमुळेच उमेदवारी मिळाली होती. गडचिरोलीमध्ये अशोक चव्हाण गटाचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या आग्रहामुळे कोवासे यांच्याऐवजी आमदार डॉ. नामदेव उसंडी यांना उमेदवारी देण्यात आली. भिवंडीमध्ये गेल्या वेळी सुरेश टावरे यांच्या विरोधात अपक्ष लढलेल्या कुणबी सेनेच्या विश्वनाथ पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. टावरे हे पहिल्यांदाच निवडून आले होते. टावरे फारसे सक्रिय नसल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यातूनच त्यांना बदलण्यात आले. मात्र टावरे यांची बाजू छाननी समिती किंवा निवडणूक समितीत कोणीच लावून धरली नव्हती.
काँग्रेसमध्ये राज्यसभा किंवा विधान परिषदेवर निवडून येणाऱ्या सदस्याला साधारणपणे लागोपाठ दोनदा संधी दिली जाते. गेल्याच आठवडय़ात पक्षाने उमेदवारांची नावे निश्चित करताना विलासराव यांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या जयप्रकाश छाजेड यांना दुसऱ्यांदा संधी दिली नाही. सभापती शिवाजीराव देशमुख यांची प्रकृती साथ देत नसताना त्यांना चौथाद्यांना संधी देण्यात आली. राज्यसभेसाठी मुरली देवरा आणि हुसेन दलवाई यांना पुन्हा खासदारकी देण्यात आली. पण आपल्याला दुसऱ्यांदा संधी नाकारण्यात आली, अशी भावना आमदार छाजेड यांनी व्यक्त केली आहे. विलासरावांचे जवळचे मानले जाणारे उल्हास पवार यांना आमदारकी नाकारण्यात आली. पण त्यांच्याकडील उर्वरित महाराष्ट्र वैधानिक मंडळाचे अध्यक्षपदही काढून घेण्यात आले. गुलाबराव घोरपडे यांच्याबाबतही असाच प्रकार झाला. लोकसभेच्या लातूर मतदारसंघातील उमेदवार निवडीसाठी मतदान पद्धत घेण्यात आल्याने पक्षांतर्गत गटबाजी वाढली, असाही विलासराव समर्थकांचा आक्षेप आहे. एकूणच पक्षात पद्धतशीरपणे खच्चीकरण होत असल्याची भावना विलासराव देशमुख समर्थकांकडून व्यक्त केली जाते.