भारताच्या परराष्ट्र धोरणात कोणताही बदल झालेला नाही. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात जशी भारताची भूमिका होती, तशीच आताही आहे, असे स्पष्टीकरण परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत दिले. इस्त्रायलकडून गाझा पट्टीवर होणाऱ्या हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर राज्यसभेत सोमवारी झालेल्या चर्चत त्या बोलत होत्या. राज्यसभेत  काँग्रेससह जवळ-जवळ सर्वच राजकीय पक्षांनी सत्ताधाऱ्यांना जाब विचारला. इस्त्रायलची निंदा करणारा प्रस्ताव सभागृहात सत्ताधाऱ्यांनी मांडावा, अशी मागी विरोधक करीत होते. मात्र असा प्रस्ताव मांडण्याचे सत्ताधाऱ्यांनी टाळले.
स्वराज म्हणाल्या की, जगभरात कुठेही हिंसा झाली तरी त्याचे समर्थन करता येणार नाही. केंद्र सरकार हिंसेच्या विरोधात आहे. पॅलेस्टाईनच्या जनतेच्या हक्कांचे संरक्षण झालेच पाहिजे, हीच आमचीही भूमिका आहे. त्याबरोबर इस्त्रायलशीदेखील आम्हाला संबंध मजबूत करायचे आहेत. आठवडाभरापासून गाझा पट्टीवर होणाऱ्या हल्ल्याविरोधात निदर्शने करणाऱ्या विरोधकांना स्वराज यांनी खडसावले. त्या म्हणाल्या की, भारताच्या परराष्ट्र धोरणात कोणताही बदल झालेला नाही. अटलबिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहन सिंह पंतप्रधान असताना जे धोरण होते तेच आजही कायम आहे. हिंसा निंदनीय आहे. दोन्ही देशांना चर्चेने तोडगा काढावा हीच भारताची भूमिका आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी चर्चेची सुरुवात केली. भारताने या हल्ल्याचा निषेध करीत निंदा करावा, अशी मागणी त्यांनी केली.

Story img Loader