आगामी विधानसभा निवडणुकीत स्वत: उभे राहण्याची घोषणा करून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी आपल्या आधीच्या विधानाला विसंगत वक्तव्य केले. ‘आमच्या घरात कुणी निवडणूक लढवली नाही’ असे सूचक वक्तव्य करत निवडणूक न लढवण्याचे संकेत राज यांनी नागपूरमध्ये बोलताना दिले.
विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर विदर्भातील इच्छुकांच्या मुलाखतींसोबतच त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी राज ठाकरे रविवारी नागपुरात आले होते. त्यावेळी बोलताना ते म्हणाले,‘मी महाराष्ट्राचा आहे. कोण्या एकाच मतदार संघाचा नाही. शिवाय, आमच्या परिवारात कुणीही निवडणूक लढली नाही. आमचा ‘जेनेटीक प्रॉब्लेम’ आहे. माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब कधीच निवडणूक लढले नाही.’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपुरातील कार्यक्रमावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी टाकलेला बहिष्कार योग्यच असल्याचेही राज यावेळी म्हणाले. ‘नागपूरच्या कार्यक्रमावर मुख्यमंत्र्यांनी बहिष्कार टाकला. अर्थात, तो त्यांच्या निर्णय असला तरी त्याचे मी समर्थन करतो. याच जागी राज्यात भाजपाचा मुख्यमंत्री असता आणि केंद्रात काँग्रेसचे सरकार असते आणि ‘हुट आऊट’ चा प्रकार भाजपाच्या संदर्भात घडला असता तर त्यांनीही तेच केले असते,’ असे ते म्हणाले.
 पक्षांतर करणे निवडणुकीपूर्वी चालणारच. जे असे करतात त्यांच्यासमोर निवडणूक हे एकच ध्येय असते. त्यांना काही आचारविचार नसतो. त्यामुळे ही आयाराम गयाराम संस्कृती सुरूच राहणार आहे, अशी टिप्पणी राज यांनी केली. विधानसभा निवडणुकीत मनसेसोबत सध्या एकही पक्ष जुळलेला नाही आणि त्याची आम्हाला गरजही नाही, असे त्यांनी सांगितले. ‘लोकसभेत केंद्रात भाजपाचे सरकार आले. त्यात नरेंद्र मोदींचा वाटा केवळ ३० टक्के, सोशल मिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचा १५ टक्के आणि उरलेला सर्व वाटा काँग्रेसचा आहे. केंद्रात भाजपाचे सरकार येणे त्यात काँग्रेसचे मोठे यश आहे. काँग्रेसने राहुल गांधींना समोर केल्याने भाजपाला ते सोयीचे आणि फायद्याचे झाले होते.’ अशी टीका करतानाच विधानसभा निवडणुकीत मात्र वेगळे चित्र असेल, असेही ते म्हणाले.
‘ब्ल्यू प्रिंट’ आठ दिवसांत
‘ब्ल्यू प्रिंट’ ही विकासाच्या दृष्टीने तयार करण्यात आली असून सात-आठ दिवसात ती जाहीर करू. त्यात काय आहे ते नंतर सगळ्यांना कळेलच, असे राज या वेळी म्हणाले. राज्यात निवडणुका झाल्यावर माझ्या हातात सत्ता दिली तर राज्याचे चित्र वेगळे राहील आणि सत्ता दिली नाही तर तेही चित्र वेगळे राहील. खरे तर, सध्या सणासुदीचे दिवस असल्यामुळे निवडणुकीचे वातावरण नाही. लोकांमध्ये तसा उत्साह नाही. आचारसंहितेचा फारच बागुलबुवा केला जात आहे. निवडणुकीचा सर्व कार्यक्रम ठरला असताना तारखा घोषित केल्या पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली. विदर्भात जास्त जागा लढवण्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.
‘स्वतंत्र विदर्भाची गरज नाही’
वेगळ्या विदर्भाबाबत बोलताना ते म्हणाले, स्वतंत्र विदर्भाची गरज नाही आणि त्याला आमचा विरोध आहे. राज्याचे दोन तुकडे होता कामा नये, अशी आमची भूमिका आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म पुण्याला झाला आणि जिजाबाईंचा जन्म विदर्भातील सिंदखेडराजात झाला. त्यामुळे आई आणि मुलांची ताटातूट करणार का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. भाजपने वेगळ्या विदर्भाबाबत भूमिका स्पष्ट केली असली तरी आमचा वेगळ्या विदर्भाला विरोध असल्याचे ठाकरे म्हणाले.

 

Story img Loader