बिहारमध्ये  काँग्रेस संयुक्त जनता दल आघाडी करण्याच्या वर्तविण्यात येणाऱ्या सर्व शक्यता बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी साफ फेटाळून लावल्या आहेत. बिहारला विशेष दर्जा देण्याचा निर्णय अखेरच्या क्षणी घेण्यात आला तरीही काँग्रेसशी आघाडी केली जाणार नाही, असेही नितीशकुमार यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे बिहारमध्ये आता काँग्रेसला राजदशिवाय अन्य पर्याय नसल्याचे बोलले जात आहे.
काँग्रेस-जद (यू)च्या आघाडीबाबत वर्तविण्यात येणारी शक्यता निराधार आहे, त्यामध्ये सत्य नाही. सुरुवातीपासूनच तशा आशयाचा कोणताही प्रस्ताव नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेस आणि राजद यांची नैसर्गिक आघाडी आहे, असेही ते म्हणाले.
काँग्रेस आणि राजद यांच्यात आघाडीसाठी चर्चा सुरू आहे किंवा नाही हा त्यांचा प्रश्न आहे, आम्हाला त्याच्याशी काहीही देणघेणे नाही. बिहारमध्ये लोकसभेच्या निवडणुकीसाठी आमचा भाकप आणि माकपशी समझोता आहे, असेही ते म्हणाले.
भाकपशी जागावाटपाची चर्चा पूर्ण झाली असून माकपसमवेत त्याबाबतची बोलणी सुरू आहेत.

Story img Loader