उद्योगमंत्री नारायण राणे यांना पक्षाने दिलेले महत्त्व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना अजूनही पचनी पडलेले दिसत नाही. पुत्र नितेश यांना उमेदवारी देण्याचे पक्षाने आपल्याला आश्वासन दिल्याचा दावा राणे करीत असतानाच नातेवाईक वा वारसांना उमेदवारी देण्यापेक्षा सक्षम किंवा निवडून येण्याची क्षमता असलेल्यांनाच उमेदवारी दिली जाईल, असा निशाणा मुख्यमंत्र्यांनी राणे यांच्यावर साधला आहे.
ऑगस्ट क्रांती दिनाच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना, सक्षमांनाच उमेदवारी दिली जाईल, असे विधान करीत मुख्यमंत्र्यांनी राणे यांच्या मुलाच्या उमेदवारीचा अद्याप निर्णय झालेला नाही, असे संकेत दिले. बंड मागे घेताना राणे यांनी मुलाच्या उमेदवारीचे आश्वासन पक्षाकडून मिळविले आहे. तसे राणे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे. दिल्लीतील नेतृत्वाने कोणते आश्वासन दिले याची बहुधा मुख्यमंत्र्यांना माहिती नसावी, अशी प्रतिक्रिया राणे यांच्या निकटवर्तीयांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर केली.
‘ते’ वृत्त चुकीचे
नशीब बलवत्तर म्हणूनच यापूर्वी हेलिकॉप्टर अपघातातून बचावलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांच्या विमानाला शनिवारी दुपारी गिधाड धडकल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली. परंतु, पोलिसांनी या घटनेचा इन्कार करत, विमान उतरतेवेळी घारींचा थवा धावपट्टीवर बसला असल्याने वैमानिकाने एक फेरी घेत विमान सुरक्षित उतरवल्याचे स्पष्ट केले.

Story img Loader