गेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मिळविलेल्या मतांमुळे शिवसेना-भाजपला मुंबईतील सहाही जागी पराभव पत्करावा लागला होता. आता मनसेच्या प्रभावाची चिंता करण्याचे आम्हाला काहीही कारण नाही. महायुती ही मनसेपेक्षा कितीतरी प्रभावशाली असून आम्ही मुंबईमधील लोकसभेच्या सहाही जागाजिंकू असा विश्वास भाजप मुंबईचे अध्यक्ष आमदार आशीष शेलार यांनी व्यक्त केला. त्याचप्रमाणे भाजपचे केंद्रीय नेते राजीव प्रताप रुडी यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे राज ठाकरे यांनी मोदी यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देऊ केला तरी तो घेतला जाणार नाही, अशी रोखठोक भूमिका शेलार यांनी मांडली. 

मनसेने मोदींना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा दिला त्यावेळीच भाजपच्या लोकसभा उमेदवारांविरोधात उमेदवार उभे करणार नाही, असे चित्र होते. मुंबईत अजूनही राज यांनी उत्तर मुंबई, ईशान्य मुंबई आणि उत्तर मध्य मुंबईतून उमेदवार जाहीर केलेला नाही. या पाश्र्वभूमीवर नितीन गडकरी यांच्या राज भेटीबाबत विचारले असता, गडकरी यांनी राज यांची भेट घेऊन काहीही चूक केली नसल्याचे त्यांनी सांगितले. महायुतीत येण्याविषयी अथवा अन्य धोरणात्मक कोणतीही गोष्ट करायची असती तर पक्षाचे मत विचारात घेणे अपेक्षित होते, असेही शेलार यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या ‘आयडिया एक्स्चेंज’ या कार्यक्रमात स्पष्ट केले.