मतदानाच्या आदल्या रात्री पैसेवाटप होत असल्याची कुणकुण लागल्याने मेधा पाटकर ‘आम आदमी पार्टी’च्या कार्यकर्त्यांसह तेथे धावल्या. पोलीस ठाणे आणि आनुषंगिक सोपस्कारात पहाटेचे ३.०० वाजले. चेंबूरच्या ११व्या रस्त्यावरील आपल्या घरी येऊन थोडा वेळ झोप काढून सकाळी साडेसहाच्या सुमारास त्या मतदारसंघात फिरण्यासाठी बाहेर पडल्या. या सर्व गडबडीत त्यांना मदत करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कार्यकर्त्यां महिलेच्या लहान मुलाची विचारपूस करायलाही त्या विसरल्या नाहीत.
गोवंडी परिसरातील फुरकानिया मशीद परिसर हा मेधाताईंचा बालेकिल्ला! येथील विराट मोर्चामुळे ‘आप’ला खूप बळ मिळाले होते. त्यामुळे मेधाताईंनी सकाळी या विभागात जाऊन पाहणी केली. साडेआठ-पावणेनऊपर्यंत या भागात फिरल्यावर त्या सव्वानऊच्या सुमारास चेंबूर येथील सुभाषनगर महापालिका शाळेतील मतदान केंद्रात आपल्या आईसह मतदानासाठी आल्या. मतदान झाल्यावर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना प्रश्न विचारून भंडावून सोडले. आपल्या मतदारसंघात कशा प्रकारे ‘मनी आणि मसल पॉवर’चा वापर होत आहे, हे त्यांनी सांगितले.
तेथून मेधाताईंचा मोर्चा त्यांच्या निवासस्थानाकडे निघाला. जवळच्या रस्त्याचे काम चालले असल्याने गाडी जाणे शक्य नव्हते. मग ताईंनी एका कार्यकर्त्यांच्या बाइकवरूनच घरापर्यंतचा प्रवास केला. घरी गेल्यावर व्यग्र वेळापत्रकातूनही पाच मिनिटे काढून त्यांनी अस्ताव्यस्त पसरलेले आपले टेबल आवरले. एवढय़ात एका कार्यकर्त्यां मुलीने त्यांच्या स्वयंपाकघराचा ताबा घेत चहा केला. चहाचे घोट घेता घेता मोबाइलवरून कार्यकर्त्यांशी संपर्क साधणे, मराठी पत्राचा हिंदी तजुर्मा तयार करणे, अशी कामे एकाच वेळी सुरू होती. तेवढय़ात फुरकानिया मशीद परिसरातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काही तरी गडबड केल्याचा निरोप आला आणि ताई पायात चपला आणि खांद्यावर झोळी अडकवून त्या परिसरात जायला निघाल्या.
दुपारी बाराच्या सुमारास त्या या परिसरात पोहोचल्या. टळटळीत दुपारचे रणरणते उन्ह, भोवताली कार्यकर्त्यांचा गराडा, कपाळावरून ओघळणाऱ्या घामाच्या धारा या परिस्थितीत ताईंनी उभ्या उभ्याच चर्चा केली. तेथे पक्षाचे पोलिंग एजण्ट्स (मतदान प्रतिनिधी) नसल्याने ताईंचा पारा चढला आणि त्यांनी कार्यकर्त्यांना फैलावर घेतले. तेथून मोर्चा गोवंडी येथील मतदान केंद्राकडे निघाला! या मतदान केंद्रात अनेक मतदारांची नावेच सापडत नसल्याची तक्रार होती. मेधाताईंनी स्वत: जातीने त्याची पाहणी केली. दीड तास ताई याच केंद्राबाहेर एका-एका मतदाराच्या नावांचा शोध घेत होत्या. मधल्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मेधा पाटकर यांच्या मतदान केंद्रातील वावराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांना नियमावलीच्या आधारे समज देऊन मेधाताई पुन्हा दुसऱ्या मतदार केंद्राकडे निघाल्या. एव्हाना दुपारचे दोन वाजले होते. पण तहानभुकेचा कोणताही विचार न करता मेधाताईंची वणवण सुरूच होती.