काही लोकांना वादळ अंगावर घेण्याची आवड असते तर काहींमध्ये संकटाचा सामना करण्याची हिंमत असते. अशा दोन व्यक्तिमत्त्वांमध्ये जेव्हा लढत होते तेव्हा टक्कर ही ठरलेली आहे. कोणताही उमेदवार सहजासहजी लढाई सोडणारा नसतो. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात नेमके हेच चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. नरेंद्र मोदी यांची लाट आणि मनसेची गैरहजेरी यामुळे वरकरणी एकतर्फी लढत दिसत असली तरीही काँग्रेसचे उमेदवार आणि विद्यमान खासदार संजय निरुपम यांनी सर्व शक्ती पणाला लावल्याचे दिसत आहे. मी लढतो ते जिंकण्यासाठीच, किंबहुना मीच जिंकणार, असा त्यांचा प्रचारातील भाव आहे.
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार गोपाळ शेट्टी यांची उमेदवारी जाहीर झाली, त्या वेळीच शेट्टी आता मोठय़ा फरकाने विजयी होणार, असे भाजप व शिवसेनेच्या प्रत्येकाचे म्हणणे होते. १९८९ पासून २००४ पर्यंत या लोकसभा मतदासंघावर भाजपचा वरचष्मा होता. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा राम नाईक यांना उमेदवारी दिली होती तर काँग्रेसने संजय निरुपम यांना तिकीट दिले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार शिरीष पारकर यांना मिळालेली १ लाख ४७ हजार मते ही निरुपम यांच्या विजयासाठी तेव्हा निर्णायक ठरली होती. निरुपम यांना २ लाख ५५ हजार तर राम नाईक यांना दोन लाख ४९ हजार मते मिळाली.
जातीपातीपलीकडे जाऊन थेट लोकांच्या दारात जाऊन काम करण्याच्या वृत्तीमुळे निरुपम यांना मानणारा एक वर्ग उभा झाला आहे. येथील उत्तर भारतीय, दलित तसेच मुस्लीम मतांबरोबरच मराठी व गुजराती पट्टय़ातही ते पोहोचल्याचे दिसून येत आहे. तर मनसे या लढतीत नसल्यामुळेच गोपाळ शेट्टी यांचे काम बरेच सोपे झाले आहे. त्याशिवाय नगरसेवक ते आमदार या वाटचालीत गोपाळ शेट्टी यांनीही लोकसेवा केली. त्यांच्या कामामुळे मतदारसंघ मैदाने व उद्यानांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जाऊ लागला. मोकळ्या जागांवर अनधिकृत झोपडय़ा उभ्या राहणार नाहीत, याची दक्षता घेत लोकांसाठी अशा जमिनींवर अनेक चांगले उपक्रम शेट्टी यांनी राबवले आहेत. उत्तर मुंबईतील आणखी एक प्रमुख मुद्दा आहे तो रेल्वे प्रवाशांचा. राम नाईक यांनी रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडली होती, तसेच अनेक प्रश्न सोडविण्यात त्यांना यश आले होते. तोच वारसा संजय निरुपम यांनीही चालविला. या पाश्र्वभूमीवर मनसे लढतीत नसूनही निवडणूक एकतर्फी होणार नाही, असे येथील चित्र आहे.
या लोकसभेतील बोरिवली, चारकोप आणि दहिसर विधानसभेत सेना-भाजपचे आमदार असून मालाड पश्चिम आणि कांदिवली पूर्व हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. मनसेने येथील मागाठणे हा किल्ला सर केला आहे. बोरिवली या गोपाळ शेट्टी यांच्या मतदारसंघात त्यांना विधानसभेत ६८ हजारांहून अधिक मते मिळाली होती. या मतदारसंघात मोठय़ा प्रमाणात गुजराती वस्ती आहे तर भाजपचे आमदार योगेश सागर यांच्या चारकोप विधानसभा मतदारसंघात गुजराती-मराठी मिश्र वस्ती आहे. योगेश सागर यांना मिळालेली ५८ हजार मते तसेच दहिसर येथून शिवसेनेच्या विनोद घोसाळकर यांची ६० हजार मते लक्षात घेता गोपाळ शेट्टी यांचा विजय वरकरणी सोपा दिसतो. तथापि येथील लोकांची विद्यमान मानसिकता लक्षात घेता शेट्टी यांना विजयासाठी कठोर परिश्रम करावे लागत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा