पुणे विद्यापीठाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्याचा प्रस्ताव तयार असूनही मंत्रिमंडळाच्या बैठकीत तो मांडण्यास टाळाटाळ केली जात असल्याच्या निषेधार्थ सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीतून सभात्याग केला.  
पुणे विद्यापीठाचे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, असा नामविस्तार करण्याची भुजबळ यांच्या समता परिषदेने केली होती. या प्रस्तावाला सरकारच्या पातळीवर अनकुलता दर्शविण्यात आली होती. पुणे विद्यापीठाच्या नामविस्तारास काही जणांचा विरोध आहे. नामविस्ताराकरिता उच्च व तंत्रशिक्षण विभागाने प्रस्ताव तयार केला आहे. प्रस्ताव तयार असूनही मंत्रिमंडळ बैठकीच्या कार्यक्रम पत्रिकेवर घेण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा भुजबळ यांचा आक्षेप आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत भुजबळ यांनी पुणे विद्यापीठाच्या नामविस्ताराचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करून मग प्रस्ताव सादर करू, असे सांगण्यात आले. पवार यांची मान्यता असून त्यांच्या सूचनेनुसारच प्रस्ताव तयार करण्यात आल्याचा दावा भुजबळ यांनी केला. मात्र त्यावर कोणीच सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने भुजबळ बैठकीतून बाहेर पडले.
मराठा आरक्षण आणि नामविस्तार  
मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या निर्णयाची इतर मागासवर्गीय समाजात काहीशी प्रतिक्रिया उमटली आहे. यालाच उतारा म्हणून पुणे विद्यापीठाचा नामविस्तार करण्याची मागणी पुढे रेटण्यात येत आहे. भुजबळ आग्रही असले तरी सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यास काही जणांचा विरोध आहे. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरावरून चांगलेच हात पोळल्याने नवा वाद नको म्हणून सरकारच्या पातळीवर विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.

Story img Loader