लोकसभेच्या निवडणुको आणि त्यानिमित्ताने सगळे पक्ष, त्यांचे नेते, निवडणुकीसाठी उभे राहिलेले उमेदवार या सगळ्याबद्दल एवढे भरभरून बोलले जात आहे, लिहिले जात आहे की काही सांगायची सोय उरलेली नाही. पण, या निवडणुका फार महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे आपण मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे. तुम्ही जर मतदान केले नाहीत, तुम्ही योग्य त्या उमेदवाराला तुमचे अमूल्य मत दिले नाहीत तर सरकार निवडून देण्याची एक अनमोल संधी तुम्ही गमावून बसता, असे मला वाटते. तुम्ही ती संधी भलत्याच कोणाच्या तरी हातात देऊन बसता. आपणच आपले लोकप्रतिनिधी निवडून देण्याबाबत उदासीनता दाखवली तर उद्या दुसरेच कोणीतरी येऊन तुमच्या देशात कोणाची सत्ता असावी, याचा निर्णय घेईल. त्यामुळे तुम्हाला जर खरोखरच आपल्या देशात, आपल्या आजूबाजूच्या राजकीय-सामाजिक परिस्थितीत बदल घडवून आणायचा असेल, आपले लोकप्रतिनिधी निवडण्याचा अधिकार आपल्याला आहे त्यामुळे आपली ही निवड जपायची असेल तर आपण मतदान केलेच पाहिजे. निवडणुकांच्या निमित्ताने आणखी एक गोष्ट सांगावीशी वाटते की प्रत्येक तरुणाने एका तरी सामाजिक उपक्रमात भाग घेणे ही आजची गरज आहे. तुम्हाला जे सामाजिक कार्य करायचे आहे, कोणत्या संस्थेबरोबर करायचे आहे त्याचा विचार करून तुम्ही सक्रिय सहभाग घेतला तर सामाजिक बदलाच्या दृष्टीने ते खूप मोठे पाऊल ठरेल.