मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये सरासरी मतदानाची टक्केवारी दहा टक्क्यांनी वाढल्याने हे मतदान प्रस्थापितांच्या विरोधात असल्याचा अर्थ काढला जात आहे. एकूणच वाढते मतदान लक्षात घेता उत्तर प्रदेशनंतर सर्वाधिक जागा असलेल्या महाराष्ट्रातील कल हा भाजप-शिवसेना युतीच्या बाजूने राहील, असा अंदाज आहे. राज्यात युतीला ३० किंवा त्यापेक्षा अधिक जागा मिळू शकतात, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
राज्यात लोकसभा निवडणुकीत ५० ते ५५ टक्क्यांच्या आसपासच मतदान होते. १९९९ मध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका बरोबर झाल्या तेव्हा ६० टक्के मतदान झाले होते. २००४ मध्ये ५४ टक्के तर २००९ मध्ये ५० टक्केच मतदान झाले होते. यंदा मात्र प्राथमिक आकडेवारीनुसार ६० टक्क्यांच्या आसपास मतदान झाले आहे. म्हणजेच गतवेळच्या तुलनेत मतदानात थेट १० टक्के वाढ झाली आहे. मुंबईत ४० ते ४५ टक्क्यांच्या आसपास मतदान होते. यंदा मुंबईतही ५३ टक्के मतदान झाले असून, गतवेळच्या तुलनेत १० टक्के वाढ झाली आहे. राज्याच्या मतदार यादीतून सुमारे ६० लाख नावे वगळण्यात आल्याने मतदानाची टक्केवारी फुगलेली दिसते, असा युक्तिवाद केला जातो. मात्र आठ कोटी मतदारांच्या तुलनेत ६० लाख म्हणजे एक टक्काही प्रमाण होत नाही. परिणामी नावे वगळल्याने मतदानाची टक्केवारी वाढली हा युक्तिवाद तेवढा ग्राह्य ठरत नाही.
विदर्भ आणि मराठवाडय़ात भाजप-शिवसेना युतीला चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. विदर्भातील दहापैकी आठ ते नऊ जागा युतीच्या निवडून येतील, अशी शक्यता आहे. मराठवाडय़ात नांदेडची जागा काँग्रेस कायम राखील.
उस्मानाबाद आणि हिंगोलीबाबत आघाडीचे नेते आशावादी असले तरी युतीचे नेते मात्र या दोन्ही जागा आम्हालाच मिळतील, असा दावा करतात. मुंबईतही युतीचे वर्चस्व राहील. उत्तर महाराष्ट्रात भाजप आपले वर्चस्व कायम राखेल, अशी चिन्हे आहेत.
विभागनिहाय अंदाज
*मुंबई (सहा जागा) – युतीचे वर्चस्व
*ठाणे आणि कोकण – संमिश्र
*विदर्भ – युतीचे वर्चस्व
*मराठवाडा – युतीचे वर्चस्व
*उत्तर महाराष्ट्र – युती वरचढ
*पश्चिम महाराष्ट्र – आघाडीच्या बालेकिल्ल्यात युतीच्या जागा वाढण्याची शक्यता
काँग्रेसच्या विरोधातील कौल?
मतदानाची वाढलेली टक्केवारी हा नेहमी सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील कौल समजला जातो. नरेंद्र मोदी घटक, काँग्रेस किंवा यूपीए सरकारच्या विरोधातील नाराजी हे मुद्दे लक्षात घेतल्यास वाढलेले मतदान हा काँग्रेसच्या विरोधातील कौल हाच अर्थ काढता येऊ शकतो. नरेंद्र मोदी घटकामुळे गुजराती मतदान वाढले तसेच त्याची प्रतिक्रिया म्हणून काही ठिकाणी मुस्लिमांची मतदानाची टक्केवारी वाढली. विदर्भात मुस्लिमांचे मतदानाचे प्रमाण वाढले असले तरी मुंबई, ठाण्यात मात्र अल्पसंख्याकांमध्ये हा जोर तेवढा दिसला नाही.

Story img Loader