भाजपप्रणीत सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची आज सांगता झाली. एरव्ही निवडणुकीपूर्वी सतत बोलणारे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर मौन झाले, ही विरोधकांनी केलेली टीका, तर राहुल गांधी यांच्या सरकारविरोधात वेलमध्ये येण्याने हे अधिवेशन गाजले. गेल्या दहा वर्षांमध्ये झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनांच्या तुलनेत हे अधिवेशन सर्वात यशस्वी ठरले, असा दावा केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री वेंकय्या नायडू यांनी केला.
गतवर्षी झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केवळ १९ तास ६७ मिनिटे कामकाज झाले होते. यंदा मात्र आम्ही लोकसभेचे कामकाज १६६ तास ५६ मिनिटे चालवले, असा दावा करीत नायडू यांनी सरकारची पाठ थोपटून घेतली. राज्यसभेत १४२ तास कामकाज झाले. मोदी सरकार अस्तित्वात आल्यानंतर वाढलेल्या कथित जातीय दंगली, यूपीएससीशी संबंधित सी सॅट, महागाई, दुष्काळ, आंध्र प्रदेश विभाजन, महिलांवरील अत्याचार आदी लोकहिताच्या विषयांवर संसदेत चर्चा झाली. अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकूण १३ विधेयके मंजूर करण्यात आली.
संसदेत विचारल्या गेलेल्या ५४० तारांकित प्रश्नांपैकी १२६ प्रश्नांना सभागृहात उत्तरे देण्यात आली. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विक्रम आहे.
सुमित्रा महाजन,लोकसभा अध्यक्ष

गाजलेले मुद्दे
*सलग दुसऱ्यांदा लोकसभा अध्यक्षपदाचा मान महिलेला मिळाला. लोकसभा अध्यक्ष व उपाध्यक्षांची बिनविरोध निवड.
*सेंट्रल हॉलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाजप सदस्यांना संबोधन व सभागृहात राष्ट्रपती अभिभाषणावरील चर्चेला उत्तर.
*उत्तर प्रदेशात वाढलेल्या जातीय दंगलीविरोधात राहुल गांधी पहिल्यांदाच आक्रमक झाले. वेलमध्ये येऊन घोषणाबाजी.
*लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्यावर पक्षपातीपणाचा विरोधकांचा आरोप.
*विरोधी पक्षनेतेपद मिळण्याची आशा असलेल्या काँग्रेसचा हिरमोड.
*ऐतिहासिक न्यायिक नियुक्ती विधेयक व न्यायिक आयोगाच्या स्थापनेसाठी घटनादुरुस्ती विधेयक मंजूर. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून अस्तित्वात असलेली कोलेजियम व्यवस्था निकाली निघाली.
*अर्थसंकल्प सादर करताना पहिल्यांदाच अर्थमंत्र्यांनी घेतली होती पाच मिनिटांची विश्रांती.
*महाराष्ट्र सदनातील ‘चपाती’ प्रकरणावरून संसदेत गदारोळ.
*येळ्ळूर गावात मराठी भाषकांवर झालेल्या हल्ल्याविरोधात शिवसेना व कर्नाटक भाजपची परस्परांवर टीका.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.