अधिकृत आकडेवारीनुसार राज्यात १८.१७ लाख मतदार हे पहिल्यांदाच मतदानाचा अधिकार बजावणारे मतदार आहेत. या तरूण मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राजकीय पक्ष आणि उमेदवार फेसबुक, टि्वटर आणि ब्लॉगसारख्या आधुनिक माध्यमांचा मार्ग चोखाळण्याचा प्रयत्न करीत आहेत. सांगायचेच झाले तर मुंबई आणि ठाणे सारख्या शहरी भागात बहुतांश उमेदवारांनी आपले स्वत:चे वेबपेज, ब्लॉग साईट, फेसबुक आणि टि्वटर खातेसुद्धा निर्माण केले आहे. निवडणूक प्रचारादरम्यान उत्तर मुंबईतील खासदार संजय निरुपम यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधताना, तरूणांसाठीचा म्हणून असा खास मॅनिफेस्टो तयार करणार असल्याचे सांगितले.
अधिकृत आकडेवारीनुसार प्रथमच मतदान करणाऱ्यांमध्ये ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजेच १.३८ लाख एव्हढी नोंदणी झाल्याचे दिसून आले, त्या खालोखाल मुंबई उपनगरात १.०९ लाख, तर पुणे जिल्ह्यात १.०१ लाख इतकी नोंदणी झाल्याचे दिसून आले आहे.