माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना नांदेड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यास आक्षेप घेण्यात आला असला तरी पक्षनेतृत्व अनुकूल असल्याचे समजते. ‘पेडन्यूज’ प्रकरणी या आठवडय़ातच निकाल अपेक्षित असल्याने पक्षाने सध्या थांबा आणि वाट पाहा, अशी भूमिका घेतली आहे.
नांदेड मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत ही २६ तारखेपर्यंत आहे. ‘आदर्श’ घोटाळ्यात अडकलेल्या अशोकरावांना उमेदवार दिली जाऊ नये. कारण त्यातून राज्यात पक्षाच्या प्रतिमेवर परिणाम होईल, असा युक्तिवाद मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे केला होता. मात्र मराठवाडय़ात पक्षाला उभारी देण्याच्या उद्देशाने अशोक चव्हाण यांनाच उमेदवारी देण्याबाबत पक्षात मतप्रवाह
आहे.
भाजपने कर्नाटकात माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना उमेदवारी दिली आहे. त्यातून विरोधी भाजपला अशोक चव्हाण यांच्या उमेदवारीचा मुद्दा करता येणार नाही, असाही युक्तिवाद मांडण्यात येत आहे. चव्हाण किंवा त्यांच्या पत्नी अमिता यांच्यापैकी एकाला उमेदवारी देण्याचा निर्णय मंगळवारी जाहीर केला जाईल.