राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची तिसरी पिढी आता राजकारणात सक्रिय झाली आहे. सुप्रिया सुळे, अजित पवार यांच्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ यांनीही लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात उडी घेतली आहे. आपले मामा, खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ पार्थ यांनी तुळजापुरात पदयात्रा काढून राजकारणात सक्रिय होणार असल्याचे संकेत दिले आहेत.
डॉ. पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे या पाटील यांना बळ देण्यास उस्मानाबादेत येऊन गेल्या. उपमुख्यमंत्री पवार यांनीही तुळजापूरला जाहीर सभा घेऊन राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केले. राजकारणात सक्रिय पवार कुटुंबातील सर्व सदस्य पाटील यांच्या प्रचारासाठी उस्मानाबादेत येऊन गेले आहेत. खुद्द शरद पवार यांनी तर ४ सभांचे नियोजन केले. पवार व पाटील परिवारातील ऋणानुबंर्धो राज्याला माहिती आहेत. दोन्ही कुटुंबांतील वडीलधारी मंडळी पाटील यांच्या प्रचारासाठी अथक परिश्रम घेत असतानाच पवारांची तिसरी पिढीही पाटील परिवाराच्या मदतीस सक्रिय झाली आहे. पाटील परिवारातील तिसऱ्या पिढीचे सदस्य, डॉ. पाटील यांचे नातू मल्हार यांच्यासोबत पार्थ पवार यांनी तुळजापुरात पदयात्रा काढली. तुळजापूर येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मल्हार पाटील यांनी, ‘पार्थ काका, आपल्या मदतीसाठी केवळ एका फोनवर आलात. राज्याच्या राजकारणात सक्रिय व्हाल, तेव्हा ही ‘काका-पुतण्या’ची जोडी राज्य हलवून सोडल्याखेरीज राहणार नाही. उस्मानाबाद आपल्याच पाठीशी राहील,’ अशी मल्लिनाथी त्यांनी केली. गळ्यात राष्ट्रवादीचे चिन्ह असलेला गमछा, दोन्ही हात उंचावून लोकांना अभिवादन करण्याची लकब यावरून पवारांची तिसरी पिढीही आता राजकारणात सक्रिय होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा