इस्रायल-पॅलेस्टाइनमध्ये सुरू असलेल्या संघर्षांचे पडसाद मंगळवारी लोकसभेत उमटले. पीडीपीच्या मेहबुबा मुफ्ती यांनी या मुद्दय़ावरून सरकारला जाब विचारला. पॅॅलेस्टाइनमध्ये आतापर्यंत १८५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी संसदेत दिली. मुफ्ती यांच्या इस्रायलविरोधी धोरणास डाव्या पक्षाचे सदस्य व काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीदेखील पाठिंबा दर्शवला. राहुल गांधी तर सीपीआयएम, तृणमूल काँग्रेस सदस्यांसह उभे होते. तृणमूल काँग्रेसचे सुगतो रॉय यांनी सरकारला धारेवर धरण्याची ही संधीदेखील सोडली नाही. हा हल्ला एकतर्फी असल्याने इस्रायलच्या निषेधाचा ठराव सरकारने मांडावा अशी मागणी विरोधकांनी केली. मुफ्ती म्हणाल्या की, शेकडो मुस्लीम नागरिकांचा जीव धोक्यात आहे. इस्रायलच्या एकतर्फी हल्यामुळे लहान मुले, महिला प्राण मुठीत घेऊन जगत आहेत. भारताने पुढाकार घेऊन इस्रायलला या प्रकाराचा जाब विचारावा. मुफ्ती यांनी शून्य प्रहर स्थगित करून या विषयावर चर्चा करण्याची विनंती सरकारला केली होती. मुफ्ती यांच्या मागणीचे समर्थन करीत डाव्या व तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी इस्रायलच्या निषेधाचा ठराव मांडण्याची मागणी सरकारकडे केली. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी निवेदन देण्याचा अथवा इस्रायलच्या निषेधाचा ठराव मांडण्याची मागणी मान्य होणार नाही असे स्पष्ट केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा