‘बर्थ डे बॉय’ नितीन गडकरी, अनंत गीते व रावसाहेब दानवे यांचा अपवाद वगळता प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, गोपीनाथ मुंडे यांनी आपापल्या खात्याचा पदभार आज स्वीकारला. प्रकाश जावडेकर यांनी माहिती व प्रसारण खात्याचा पदभार स्वीकारला. दुपारी सव्वाबारा वाजता शास्त्री भवनातील आपल्या कार्यालयात दाखल झालेल्या जावडेकर यांनी तातडीने कामाला सुरुवात केली आहे. माहिती व प्रसारण विभागातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची विस्तृत बैठक जावडेकर यांनी बुधवारी बोलावली आहे. तीन तासांच्या या बैठकीत जावडेकर आपल्या खात्याची बित्तंबातमी घेणार आहेत. जावडेकर पर्यावरण मंत्रालयाचा कारभार गुरुवारी स्वीकारणार आहेत.
भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येसच मंत्रिपदाच्या शपथविधीच्या रूपाने ‘बर्थ डे’ गिफ्ट मिळाले. मोदींच्या कॅबिनेटमध्ये गडकरींकडे रस्ते वाहतूक व जहाज बांधणी मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. मंगळवारी गडकरी तडक नागपूरला रवाना झाले. ते गुरुवारी मंत्रिपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. अन्न वितरण व ग्राहक व्यवहार राज्यमंत्री रावसाहेब दानवे बुधवारी निवडक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारणार आहेत.
आक्रमक प्रचार करून मोदींच्या विजयाला ‘अर्थ’ प्राप्त करून देणारे पीयूष गोयल यांनी मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी गुजरातचे गुणगान केले. वीजनिर्मिती व वितरणात गुजरातचा हात कुणीही धरू शकत नाही. गुजरातची ऊर्जा क्षेत्रातील प्रगती समजून घेण्यासाठी लवकरच दौरा करणार आहे, असे खात्याचा कारभार स्वीकारताना ते म्हणाले.
भूसंपादन कायद्याची काटेकोर अंमलबजावणी, सर्वाना पिण्याचे स्वच्छ पाणी, स्वच्छता, एमजीनरेगा योजनेत विकासाभिमुख बदल करीत ती राबविणे या बाबींना प्राधान्य दिले जाईल. स्वच्छता कार्यक्रमांना तसेच शौचालय बांधणीस चालना दिली जाईल. नक्षलग्रस्त ८२ जिल्ह्य़ांसह देशातील अतिशय मागास असलेले २५० जिल्हे विकासाच्या दृष्टीने प्राधान्याने हाताळले जातील, अशी प्रतिक्रिया गोपीनाथ मुंडे यांनी पदभार स्वीकारताना दिली.