नेपाळशी द्विपक्षीय संबंध दृढ करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेपाळ दौऱ्याकडे पाहिले जात आहे. रविवारी मोदी नेपाळला जात असून, भारत-नेपाळ संबंधाचे नवे युग या दौऱ्याने सुरू होईल अशी अपेक्षा मोदींनी व्यक्त केली आहे. दौऱ्यापूर्वी मोदींनी आपल्या आठवणी जागवल्या.
व्यापार, गुंतवणूक, जलविद्युत प्रकल्प, कृषी क्षेत्र, कृषी प्रक्रिया व पर्यावरण अशा विविध क्षेत्रांत संबंध दृढ होतील असे मोदींनी स्पष्ट केले. दोन दिवसीय दौऱ्यात मोदी पंतप्रधान सुशील कोईराला तसेच उद्योजकांशी चर्चा करतील. दौऱ्याच्या पूर्वसंध्येला केलेल्या ट्विप्पणीत मोदींनी या दौऱ्याशी निगडित असलेल्या त्यांच्या काही व्यक्तिगत भावनांना उजाळा दिला. ते म्हणाले, खूप वर्षांपूर्वी मला असाहाय्य अवस्थेतील एक छोटासा मुलगा- जीत बहादूर- भेटला. कुठे जायचे? काय करायचे? त्याला काहीच माहीत नव्हते. तो कुणाला ओळखतही नव्हता. त्याला भाषासुद्धा नीट समजत नव्हती. ईश्वराच्या प्रेरणेने मी त्याच्या आयुष्याची काळजी घेणे सुरू केले. हळूहळू शिक्षणात, खेळात त्याला रुची वाटू लागली. गुजराती भाषा समजू लागली. काही महिन्यांपूर्वीच मला त्याच्या माता-पित्यांचा शोध लावण्यातही यश आले. ती गोष्टही मजेशीर होती. ते शक्य झाले, कारण त्याच्या पायाला सहा बोटे होती. उद्या मी त्यांच्या हाती त्यांचा मुलगा सोपवीन. मला त्याचाच आनंद वाटतो आहे.नेपाळच्या संसदेत भाषण करण्याचा बहुमान त्यांना मिळाला आहे. जर्मनीचे माजी चान्सलर हेलमट कौल यांच्यानंतर हा सन्मान मोदींना मिळाला आहे.