काँग्रेस पक्ष आता संपल्यागत झाला असून भाजपही या लोकसभा निवडणुकीनंतर राजकीयदृष्टय़ा संपलेला असेल आणि देशात तिसऱ्या आघाडीचा पंतप्रधान बनेल, असे अफलातून भाकित भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी नागपुरात वर्तविले.
नरेंद्र मोदी यांची लाट फक्त माध्यमांमध्येच आहे. यंदा लोकसभा निवडणुकीत ज्येष्ठ नेत्यांना दूर सारल्याने भाजपला मोठा फटका बसून फारतर दीडशे जागा मिळतील. काँग्रेसला ७२ ते ८० तर तिसऱ्या आघाडीला तीनशे जागा मिळतील. काँग्रेस पक्ष संपल्यागत झाला आहे. बहुजन समाज पक्ष व आम आदमी पक्ष एकाच माळेचे मणी आहेत. दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष म्हणून मिळालेली संधी आम आदमी पक्षाने घालविली आहे. ‘राष्ट्रीय स्तरावर काँग्रेसला तर राज्य पातळीवर बसपला पाठिंबा’ असे काँग्रेसने पुढे केलेले समीकरण मायावतींनी अव्हेरले. प्रत्येकच वेळी ताठर भूमिका घेत असल्याने बसपला सत्तेपासून दूर रहावे लागणार आहे. अशा परिस्थितीत ममता बॅनर्जी, जयललिता, नवीन पटनायक, नितीशकुमार, समाजवादी पक्ष यांच्यापैकी कुणीतरी एक पंतप्रधान होईल. दोन वर्षांनी राज्यांमध्ये निवडणुका असल्याने स्थिरता राहील. असे असले तरी घटक पक्षांना एकत्र ठेवणे हे मोठे आव्हान ठरणार आहे.
रिपब्लिकन पक्षाचे विविध गट असल्याने त्यांची उपयुक्तता संपली की काय, अशी शंका निर्माण होते. दलित व मुस्लिम मतदार हे विविध मतदारसंघात विविध उमेदवारांचे भविष्य ठरवतील. मतांची टक्केवारी सात ते आठ टक्के राहील. या चळवळीतील एकमेकांचे जवळचे नाते असलेले दोन नेते हे दोघे भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांचे काम करीत असून काँग्रेसला पाठिंबा हा त्या दोघांचा केवळ देखावा आहे, असा आरोप आंबेडकर यांनी केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मांडणी व्यक्तिपूजक नाही. मग नरेंद्र मोदींना प्रोजेक्ट कसे केले गेले, असा सवाल त्यांनी केले. निवडणुकीआधीच पंतप्रधान म्हणून एखाद्याला प्रोजेक्ट केले जाते, याचा अर्थ सांसदीय लोकशाहीवर विश्वास नाही. हे समाजाच्या दृष्टीने आणि पर्यायाने देशाच्या दृष्टीने घातक असल्याचे ते म्हणाले. राष्ट्रीय सुरक्षा हा विषय गंभीर असून काँग्रेस व भाजप मात्र त्याविषयी गंभीर नसल्याचा आरोप करीत व्होरा समितीचा अहवाल जाहीर का केला जात नाही, असा केला. हा अहवाल लपविला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. या निवडणुकीच्या काळात घातपात होऊ शकतो, असा गुप्तचर अहवाल केंद्र शासनाला प्राप्त झाला असून यासंबंधी पत्र शासनाला दिले असल्याचे तसेच राष्ट्रीय सुरक्षा हा गंभीर मुद्दा असल्यानेच तो प्रचाराचा मुद्दा असल्याचे त्यांनी सांगितले.
तिसऱ्या आघाडीचा पंतप्रधान बनेल-आंबेडकर
काँग्रेस पक्ष आता संपल्यागत झाला असून भाजपही या लोकसभा निवडणुकीनंतर राजकीयदृष्टय़ा संपलेला असेल आणि देशात तिसऱ्या आघाडीचा पंतप्रधान बनेल
First published on: 30-03-2014 at 08:03 IST
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm will be form third front prakash ambedkar