यूपीए सरकारने नेमलेल्या राज्यपालांना पदावरून दूर करण्याच्या हालचालींवर विरोधकांकडून टीका होऊ लागल्याने केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू सरकारच्या बचावासाठी पुढे आले आहेत. राजकीयदृष्टय़ा ज्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत त्या पदांवरील व्यक्तींनी प्रचलित यंत्रणेच्या हितासाठी स्वेच्छेने पदत्याग केला पाहिजे, असे मत नायडू यांनी व्यक्त केले आहे. राजकीयदृष्टय़ा ज्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत, असा शब्दप्रयोग आपण केला असल्याने त्याचा अधिक विस्तार करण्याची अथवा अधिक स्पष्टीकरण देण्याची गरज नाही, असेही नायडू यांनी स्पष्ट केले.काँग्रेसने याबाबत आम्हाला उपदेश करू नये, असे सांगून नायडू यांनी, राजकीय नियुक्त्या राजकीय बदलानुसारच व्हाव्यात, असेही त्यांनी नमूद केले. काँग्रेसचे काही नेते आम्हाला उपदेशाची मात्रा देत आहेत, मात्र त्यांनी काय केले त्याचा  विचार करावा. त्यांनी केले तर ते चांगले, अन्य कोणी केले तर ते वाईट, हे योग्य आहे का, असा सवालही नायडू यांनी केला. एकदा नवे सरकार स्थापन झाले की जुन्या राजकीय नियुक्त्या गेल्या पाहिजेत, हेच कारभार सुरळीत चालण्यासाठी योग्य नाही का, असा सवालही त्यांनी केला.