१५ व्या लोकसभेच सूप शुक्रवारी वाजल़े त्यामुळे संसदीय शह-काटशहाच्या राजकारणाला तूर्त विराम मिळाला आह़े आता लढत आहे ती थेट मैदानातच! लोकसभा निवडणुकांचे हे मैदान आता दोन महिन्यांच्या अंतरावर येऊन ठेपले आह़े प्रचाराचा धुरळा उसळायला आधीच सुरुवात झाली आह़े आता त्याला अधिक रंगत येणार आह़े शर्यतीत धावणारे कोण आणि नुसत्या टाळ्या पिटणारे कोण, याच्या निवडीचा हा टप्पा आह़े पक्ष कोणताही असो निवडणुकांचा रंग तर प्रत्येकाला चढू लागला आह़े
काँग्रेसची उमेदवार निवडीसाठी पूर्वपरीक्षा
लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी उमेदवार निवडताना त्यामध्ये तळागाळातील कार्यकर्त्यांचा सहभाग असावा यासाठी काँग्रेसने आता उमेदवारांची प्रायोगिक तत्त्वावर पूर्वपरीक्षा घेण्याचे ठरविले आहे. याचा पहिला प्रयोग नवी दिल्ली मतदारसंघात करण्यात येणार आहे. सध्या काँग्रेसचे नेते अजय माकन हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत.
देशातील १५ मतदारसंघांत उमेदवारांची पूर्वपरीक्षा घेण्याबाबतची संकल्पना काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मांडली.
अमेरिकेच्या अध्यक्षांच्या निवडीच्या धर्तीवर आता मतदार याद्या तयार करणे आणि काँग्रेसच्या विविध युनिटचे पदाधिकारी यांची नावे समाविष्ट करण्यात येणार आहेत. येत्या २४ फेब्रुवारी रोजी मतदार याद्यांचा मसुदा जाहीर करण्यात येणार असून इच्छुक उमेदवारांनी २७ फेब्रुवारीपर्यंत आपले उमेदवारी अर्ज सादर करावयाचे आहेत. त्यानंतर मतदानाची तारीख जाहीर करण्यात येणार असल्याचे निवडणूक अधिकारी एन. डिसूझा यांनी सांगितले. या प्रकल्पामुळे स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांना लोकसभेच्या निवडणुकीसाठी आपल्या पसंतीच्या उमेदवारची निवड करता येणार आहे.
भाजपची पहिली यादी २७ फेब्रुवारीला?
भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची पहिली बैठक येत्या २७ फेब्रुवारी रोजी येथे होणार आह़े बैठकीत उमेदवारांबाबत चर्चा होणार आह़े त्यामुळे बैठकीनंतर पक्षाची लोकसभा निवडणुकीसाठी पहिली उमेदवार यादी जाहीर होण्याची शक्यता आहे, अशी ट्विप्पणी भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांनी केली आह़े
या बैठकीत लालकृष्ण अडवाणी, राजनाथ सिंग, नरेंद्र मोदी, अरुण जेटली, सुषमा स्वराज, मुरली मनोहर जोशी आदी अनेक ज्येष्ठ नेते सहभागी होणार आहेत़ चर्चेनंतर उमेदवारांची निश्चिती होणार आह़े सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या पहिल्या बैठकीत निर्विवादास्पद जागांवर आणि पक्षातील बडय़ा नेत्यांच्या जागांवर उमेदवार घोषित करण्यात येतील़
आज ‘आप’च्या लोकसभा प्रचाराचा नारळ फुटणार
दिल्ली विधानसभेत सुरुवातीला धक्कादायक निकालांनी आपल्या पक्षाची दखल घेण्यास भाग पाडणाऱ्या आम आदमी पक्षाची लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची मोहीम रविवारपासून सुरू होत आहे. येथील रोहतकमध्ये पक्ष प्रमुख अरविंद केजरीवाल एका मेळाव्यास संबोधित करणार आहेत. या मेळाव्यात आपचे ज्येष्ठ नेते योगेंद्र यादव आणि मनीष सिसोदिया हेही मार्गदर्शन करतील, अशी माहिती हरयाणातील आपचे प्रवक्ते राजीव गोदारा यांनी दिली.
रोहतक हा हरयाणाचे मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुडा यांचा मतदारसंघ आहे, तर योगेंद्र यादव यांचे मूळ गांवही हरयाणातील आहे. त्यामुळे नुकताच आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिलेले केजरीवाल आणि यादव प्रचाराचा नारळ फोडतील. भ्रष्टाचारास विरोध, महागाई, घोटाळे, राजकारणातील घराणेशाही अशा मुद्यांभोवती आम आदमी पक्षाची व्यूहरचना असेल, असे संकेत पक्ष प्रवक्त्यांनी दिले. दरम्यान, हिस्सार येथे डाव्या पक्षांतर्फे रविवारीच ‘विकल्प’ (पर्याय) मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा