‘पेडन्यूज’ प्रकरणाचे पडसाद मंगळवारी लोकसभेत उमटले. अशा प्रकारच्या गैरव्यवहारांमध्ये कोणताही सदस्य दोषी ठरल्यास त्याला त्वरित अपात्र ठरवावे, अशी मागणी भाजपचे किरीट सोमय्या यांनी लोकसभेत केली. ‘पेडन्यूज’प्रकरणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. सभागृहात शून्य प्रहराला हा प्रश्न उपस्थित करताना सोमय्या म्हणाले की, निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीवर निवडणूक आयोगाने पेडन्यूजबाबत नोटीस बजावली आहे. या प्रकरणाचा निवडणूक प्रक्रियेवर विपरीत परिणाम होणार असल्याने सरकारने याची दखल घ्यावी, अशी विनंती सोमय्या यांनी केली.पेडन्यूजप्रकरणी अशोक चव्हाण यांनी आमदार म्हणून आपला निवडणूक खर्च सादर केला नाही, त्यामुळे आपल्याला अपात्र का ठरविण्यात येऊ नये, अशी नोटीस निवडणूक आयोगाने बजावल्यानंतर हा प्रश्न उपस्थित झाला आहे. पेडन्यूज आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी काही उमेदवारांकडून वारेमाप खर्च करण्यात आला, असा आरोप सोमय्या यांनी केला. ज्यांनी अशा प्रकारे खर्च केला त्यांना त्वरित अपात्र ठरविण्यात आले पाहिजे, असे सोमय्या म्हणाले. अशा प्रकरणांबाबत तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे, असेही सोमय्या म्हणाले.

सामाजिक कार्यासाठी वेतन, भत्ते नकोत, भाजप आमदाराचा निर्णय
भोपाळ: रतलाम येथील भाजपचे आमदार चैतन्यकुमार कश्यप यांनी दरमहा मिळणारे वेतन आणि भत्ते न घेण्याचा निर्णय घेतला असून तशा आशयाचे पत्र कश्यप यांनी विधानसभेचे अध्यक्ष सीताशरण शर्मा यांना पाठविले आहे.गेल्या अनेक वर्षांपासून आपण सामाजिक कार्यात असल्याने वेतन आणि भत्ते न घेण्याचा निर्णय घेतला आहे, असे कश्यप यांनी पत्रात म्हटले आहे.

नॅशनल कॉन्फरन्सची पहिली यादी जाहीर
श्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीसाठी सत्तारूढ नॅशनल कॉन्फरन्सने मंगळवारी आपल्या ३२ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. सत्तारूढ पक्षाच्या विद्यमान २८ पैकी २० आमदारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली संसदीय मंडळाची बैठक झाली   विधानसभेचे अध्यक्ष मुबारक गुल आणि दहा मंत्र्यांचा यादीत समावेश आहे.पक्षाचे अध्यक्ष फारूक अब्दुल्ला यांनी यादीवर शिक्कामोर्तब केले.

Story img Loader