स्कर्ट परिधान करणे ही गोव्याची संस्कृती नाही, असे वक्तव्य सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी केले होते. त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने थेट मंत्र्यांना गुलाबी स्कर्ट पाठवला आहे.१८ वर्षांवरील व्यक्तीला घटनेनुसार चांगले काय, वाईट काय हे ठरवण्याचा अधिकार आहे. आम्ही अशी नैतिक दडपशाही सहन करणार नाही, असे गोवा काँग्रेसचे प्रवक्ते दुर्गादास कामत यांनी सांगितले. तोकडय़ा कपडय़ातील मुलींमुळे संस्कृतीचा ऱ्हास होत असल्याचे वक्तव्य प्रमोद मुतालिक यांनी केले होते. त्याला ढवळीकर यांनी पाठिंबा देत, मुतालिक यांचे वक्तव्य कोणत्याही धर्माच्या विरोधात नसल्याचे सांगितले. पब संस्कृतीच्या विरोधात मुतालिक यांची भूमिका योग्य असल्याचे समर्थनही ढवळीकर यांनी केले.
केरळ विधानसभेतून विरोधकांचा सभात्याग
थिरुवनंतपूरम:कासारगोड जिल्ह्यातील पन्नथडी येथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी ‘डीवायएफआय’च्या कार्यकर्त्यांची हत्या केल्याप्रकरणी दिलेली सभा तहकुबीची सूचना स्वीकारण्यास नकार दिल्याच्या निषेधार्थ माकपच्या नेतृत्वाखालील एलडीएफच्या विरोधकांनी मंगळवारी केरळ विधानसभेतून सभात्याग केला.माकपचे जेम्स मॅथ्यू यांनी दिलेल्या तहकुबीच्या सूचनेला उत्तर देताना गृहमंत्री रमेश चेन्निथला म्हणाले की, ‘डीवायएफआय’चा कार्यकर्ता अब्दुल शरीफ यांची हत्या राजकीय नसून ती स्थानिक पातळीवरील वादातून झाली आहे. याच परिसरात भाजपचा कार्यकर्ता अरुण लाल याचीही क्षुल्लक कारणावरून हत्या झाली आहे. त्यामागेही राजकीय कारण नाही, असेही गृहमंत्री म्हणाले. यामधील एक आरोपी माकपचा कार्यकर्ता आहे, असेही ते म्हणाले.
पेट्रोल, डिझेल दरवाढीचे आश्चर्य नाही -नितीशकुमार
पाटणा: नरेंद्र मोदी यांच्या सरकारने दिलेल्या टोलेजंग आश्वासनांची अद्याप पूर्ती झालेली नाही. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आवाक्याबाहेर गेलेल्या असतानाच पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचे आपल्याला जराही आश्चर्य वाटत नाही, अशी टीका जनता दलाचे (युनायटेड) ज्येष्ठ नेते व बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मंगळवारी येथे केली.
निवडणुकीच्या काळात ‘अच्छे दिन आएंगे’ च्या नावाखाली प्रचंड आश्वासने देऊन मोदी सरकारने सत्तेवर येताना लोकांच्या अपेक्षा वाढविल्या; परंतु या सर्वच दरवाढीचे आश्चर्य वाटत नसल्याचे मत नितीशकुमार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. मोदी सरकारच्या ‘अच्छे दिन आएंगे’च्या घोषणेची गत मागील रालोआ सरकारच्या ‘इंडिया शायनिंग’सारखीच होईल काय, या प्रश्नावर नितीशकुमार यांनी अर्थपूर्ण स्मितहास्य केले. मात्र सरकारच्या चुका उघड करण्यापूर्वी विरोधक सरकारला अधिक कालावधी देत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

Story img Loader