भारतीय जनता पक्षाचे(भाजप) पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना निवडणूक आयोगाकडून वाराणसी मतदार संघात प्रचारसभांसाठी परवानगी नाकारण्यात आली आहे. नियोजित कार्यक्रमानुसार नरेंद्र मोदी वाराणसीत दोन प्रचारसभा घेणार होते. परंतु, निवडणूक आयोगाकडून परवानगी नाकारण्यात आल्याने मोदींवर प्रचारसभा रद्द करण्याची नामुष्की ओढावणार आहे.
परवानगी नाकारण्यात आल्याबद्दलचे नेमके कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. भाजप नेत्यांनी या निर्णयाचा तीव्र विरोध केला आहे. परवानगी नाकारून नरेंद्र मोदींविरोधात कटकारस्थान रचले जात असल्याचा आरोप भाजप नेत्या निर्मला सितारामन यांनी केला आहे.
वाराणसी मतदार संघातून नरेंद्र मोदी लोकसभेच्या रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून अजय राय आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांचे आव्हान असणार आहे. याआधी २४ एप्रिल रोजी मोदी यांनी वाराणसीतून आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना भव्य शक्तीप्रदर्शन केले होते.

Story img Loader