गुरुवारी दुपारी साडेचार वाजल्यापासून वांद्रे (पश्चिम) येथील बडी मशीदपाशी ‘भाजप’चे कार्यकर्ते आणि प्रचारफेरीत सहभागी होणाऱ्या ‘पाहुण्यां’ची गर्दी झालेली. यात महिला आणि किशोरवयीन मुलांचे प्रमाण अधिक. बरोबर पाचच्या ठोक्याला पूनम महाजन येतात आणि निवडणूक रथावर आरूढ होतात. कार्यकर्ते आणि ‘भाडोत्री पाहुण्यां’मध्ये एकच जल्लोष उसळतो. स्थानिक मुस्लिम नागरिक भला मोठ्ठा हार घालून पूनम महाजन यांचे स्वागत करतात. एवढा मोठा हार घालून फिरणे शक्य नसल्याने पूनम महाजन काही क्षणानंतर तो हार गळ्यातून काढतात. कार्यकर्ते लगेच तो हार गाडीच्या दर्शनी भागी लावतात आणि प्रचारयात्रा सुरू होते.
बडी मशीद ते वांद्रे बस आगारापर्यंतचा हा मार्ग खूप चिंचोळा. बहुतांश सर्व भाग मुस्लिमबहुल वस्तीचा. प्रचाररथावर पूनम महाजन यांच्यासमवेत मुंबई भाजपचे अध्यक्ष अ‍ॅड. आशिष शेलार आणि भाजप-शिवसेनेचे काही पदाधिकारीही असतात. लोकांचे अभिवादन स्वीकारत, हात उंचावून ‘व्ही’ अशी विजयाची खूण करत रथ हळूहळू पुढे चाललेला असतो. या मार्गात महिलांकडून पूनम यांना औक्षण केले जाते आणि विजयी होण्यासाठी आशीर्वादही दिला जातो. यापैकी एक असतात महापालिका शाळेजवळ, चाळ क्रमांक ८ मध्ये राहणाऱ्या अंकिता शिर्के. महापालिकेच्या वांद्रे यानगृहाजवळ काही मुस्लिम महिलांकडूनही पूनम यांना हार, पुष्पगुच्छ दिले जातात. येथील काही वस्ती आंबेडकरी असल्याने येथे आवाजविरहित फटाक्याची आतषबाजी होते आणि संपूर्ण आसमंतात निळा धूर पसरतो. याच मार्गावर अनेकांकडून पूनम यांच्यावर गुलाब आणि झेंडूच्या पाकळ्यांचाही वर्षांव केला होतो.
रथावरील निलेश हांडगर या कार्यकर्त्यांकडून अजिबात विश्रांती न घेता प्रचार यात्रेचे ‘धावते वर्णन’ सुरू असते. रथावर उभे असलेल्या भाजप व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची नावेही तो आवर्जून घेत असतो. या निलेशचा मित्र साद कुरेशीही प्रचार यात्रेत सहभागी झालेला असतो. साद या वर्षी बाहेरून १२ वीची परीक्षा देणार आहे. तो म्हणतो, माझ्या मित्रामुळे मी या प्रचारफेरीत सहभागी झालो आहे. एव्हढय़ा एक महिला त्यांना काजूकतली देत़े त्यावर पूनम म्हणतात ‘अहो, मावशी गोड जास्त खाल्ले तर मी आणखी जाडी होईन ना’ असे हसत हसत सांगतात. लकी रेस्टरंट चौक, जामा मशीद, बाजार गल्ली येथून प्रचार फेरी मार्गक्रमण करत असते. बडा जमात खाना येथे शाकीर हा युवक पुनम महाजन यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करतो तर याच मार्गावर पुढे मोहमंद जावेद कुरेशी हे गृहस्थ प्रियदर्शनी सोसायटीतील रहिवाशांच्यावतीने पूनम यांना शाल भेट देतात.

श्रीरामाचे दर्शन बाहेरून..
फेरीत वाटेत एका ठिकाणी सातघरे यांचे श्रीराम मंदिर लागते.
मंदिराच्या वतीने दोनजण पूनम यांचे स्वागत करून त्यांना आशीर्वाद देतात. ‘श्रीरामा’च्या नावावर ‘भाजप’चे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी काही वर्षांपूर्वी रथयात्रा काढली आणि त्या वेळच्या लोकसभा निवडणुकीत ‘भाजप’च्या खासदारांची संख्या ८० च्या पुढे गेली. आजही ‘भाजप’ने ‘श्रीरामा’ला सोडलेले नाही. त्यामुळे पूनम रथावरून खाली उतरून रामाच्या दर्शनासाठी देवळात जातील, असे वाटून गेले. पण तसे झाले मात्र नाही. असे झाले असते तर स्थानिक नागरिकांमध्ये एक वेगळा संदेश गेला असता.

Story img Loader