राष्ट्रवादीमध्ये शरद पवार यांच्यानंतर पक्षात दुसऱ्या क्रमांकाचे नेते कोण, असा प्रश्न नेहमीच उपस्थित होतो. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पक्षावर चांगलेच नियंत्रण असल्याने कार्यकर्त्यांच्या दृष्टीने साहेबांनंतर अजितदादाच, असे चित्र आहे. मात्र राष्ट्रीय स्तरावर विचार केल्यास पवार यांच्यानंतर प्रफुल्ल पटेल असेच उत्तर दिले जाते. दिल्लीत प्रफुल्ल पटेल म्हणजे शरद पवार यांचा उजवा हात अशी ओळख आहे. काँग्रेस नेत्यांशी वाटाघाटी असो, वा काँग्रेसला सूचक इशारे द्यायचे असोत, ही कामगिरी प्रफुल्ल पटेल करीत असतात. सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यातील कटुता पटेल यांनीच दूर केली होती. पवार यांच्या मनात काय आहे, याचा कोणालाच थांगपत्ता लागत नाही. पण पुतण्या अजितदादांपेक्षा पवार यांना प्रफुल्ल पटेल अधिकच जवळचे असल्याचे राष्ट्रवादीचे नेतेही खासगीत मान्य करतात. पवार यांचा राजकीय वारस कोण, अजित की सुप्रिया, हा तर कायम चघळला जाणारा विषय. अजित हे चुलत बंधू असले तरी वडिलांप्रमाणेच (शरदराव) सुप्रिया सुळे यांनाही पटेल अधिक जवळचे असल्याचे पक्षाचे नेत्यांकडून सांगण्यात येते. प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार या दोन नेत्यांचे मात्र फारसे पटत नाही. कारण मध्यंतरी म्हणे पटेल यांनी राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण करावे, असा सल्ला दिला होता. यावर अजितदादा भलतेच संतापले. पटेल यांचे पक्षातील वाढते महत्त्व अजितदादांना रुचत नाही. आता उमेदवारी अर्ज भरण्याच्या निमित्ताने हे पुन्हा समोर आले. अमरावतीमध्ये नवनीत कौर राणा यांना उमेदवारी देण्यबाबत पक्षात दोन मतप्रवाह होते. पण अजितदादांच्या सल्ल्याने राणा यांना उमेदवारी देण्यात आली. त्याचा पुढचा इतिहास तर ताजाच आहे. त्यांची आक्षेपार्ह छायाचित्रे किंवा जात प्रमाणपत्राचा विषय गाजतच आहे. नवनीतताईंचा उमेदवारी अर्ज भरण्याकरिता अजितदादा शुक्रवारी खास अमरावतीमध्ये दाखल झाले होते. अर्ज भरल्यावर त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. राणा यांच्या उमेदवारीला विरोध करणाऱ्या संजय खोडके यांच्या गटातील कार्यकर्त्यांना इशारा दिला. दुसऱ्याच दिवशी म्हणजे शनिवारी भंडारा-गोंदिया मतदारसंघातून प्रफुल्ल पटेल यांनी अर्ज भरला तेव्हा अजितदादा उपस्थित नव्हते. तेव्हा प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव आले होते. विदर्भात एका उमेदवाराच्या विजयासाठी (नवनीत राणा) पुढाकार घेणारे अजितदादा विदर्भातच उमेदवार असलेले पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा अर्ज भरण्याच्या वेळी फिरकले नाहीत याची चर्चा तर सुरू झालीच. …
अजितदादांना हे कसे ‘पटेल’ ?
राष्ट्रवादीमध्ये शरद पवार यांच्यानंतर पक्षात दुसऱ्या क्रमांकाचे नेते कोण, असा प्रश्न नेहमीच उपस्थित होतो. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पक्षावर चांगलेच नियंत्रण
First published on: 24-03-2014 at 01:00 IST
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Praful patel close tom sharad pawar than ajit pawar