लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्यानंतरही येणारी विधानसभा निवडणूक भारिप-बहुजन महासंघ महाराष्ट्र लोकशाही आघाडीतर्फे(मलोआ) लढवणार आहे. काही पक्षांसोबत आघाडीबाबत चर्चा सुरू असून ७ ऑगस्टनंतर अंतिम स्थिती स्पष्ट होणार असल्याची माहिती भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र लोकशाही आघाडीचे मुख्य संयोजक अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी रविभवनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्र लोकशाही आघाडीत पाच राजकीय पक्ष आणि सात सामाजिक संघटनांचा समावेश आहे. यात कामगार, अंगणवाडी सेविका, खासगी रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संघटना, माथाडी कामगार संघटनांचा समावेश आहे. या संघटनांना मागण्या मान्य करून घेण्यासाठी एका राजकीय पक्षाची आवश्यकता होती. त्यामुळे त्यांनी लोकशाही आघाडीत येण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ही संघटना बळकट झाली असून येत्या विधानसभा निवडणुकीत आपली शक्ती दाखवून देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
राज्यात युतीप्रमाणेच आघाडीमध्येही आलबेल नाहीच. निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षासोबत युती व आघाडी स्थापन करून सत्ता प्राप्त केली जाऊ शकते, असेही आंबेडकर म्हणाले.
विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मराठा आणि मुस्लिम सामाजाला आरक्षण दिले. मराठा ही जात सूचीमध्ये दिसून येते, परंतु मुस्लिम ही जात म्हणून दिसून येत नाही. त्यामुळे मुस्लिम हा कुठला वर्ग आहे, हे स्पष्ट करून आपली चूक सुधारावी. तसेच इस्लामला मानणाऱ्यांना आरक्षण द्यावे, असे आंबेडकर म्हणाले.

Story img Loader