लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी काँग्रेसबरोबर युती करण्याची आमची तयारी होती, परंतु त्या पक्षालाच समझोता करायचा नाही, त्यामुळे भाजप व नरेंद्र मोदी यांच्याविरोधात कडवट भूमिका घेणाऱ्या आम आदमी पक्षाशी युती करण्याची आपल्या आघाडीची तयारी आहे, असे भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी जाहीर केले. काँग्रेसबरोबरची चर्चा आता बंद झाली आहे, असे त्यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली २३ लहान-मोठय़ा पक्ष-संघटनांची महाराष्ट्र लोकशाही आघाडी स्थापन केली आहे. भाजपचा पराभव करण्यासाठी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसशी युती करण्याची आघाडीची तयारी होती. त्यासंदर्भात काँग्रेसशी प्राथमिक चर्चा झाली होती, त्यानंतर कोणत्या मुद्यांवर युती व्हावी, याबाबत पत्रव्यवहारही करण्यात आला. अगदी अलीकडे चार दिवसांपूर्वी आपण समझोत्याबाबत चर्चा करावी, असे काँग्रेस नेत्यांना पत्र दिले होते. परंतु काँग्रेस नेत्यांकडून त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता त्या पक्षाशी युती करण्यात आम्हाला रस नाही, असे आंबेडकर यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.
प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीत आपशी समझोता करण्याबाबत चर्चा झाली. आपच्या निमंत्रक अंजली दमानिया यांना तसे पत्र पाठविण्याचे ठरले. ‘आप’च्या उत्तराची १० मार्चपर्यंत प्रतिक्षा केली जाईल. त्यानंतर ११ मार्चला आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
काँग्रेस-राष्ट्रवादीने निळा झेंडा टाकला
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची एकाही रिपब्लिकन गटाबरोबर युती करण्याची तयारी नाही, रिपाइंचे विविध गटही फारसे उत्सुक नाहीत. साहजिकच या वेळी पहिल्यांदाच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रचारात निळा झेंडा दिसणार नाही. रामदास आठवले यांचा गट शिवसेना-भाजपबरोबर गेल्याने महायुतीच्या प्रचारात मात्र भगव्याबरोबर निळा झेंडा फडकताना दिसेल. आम्ही फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचाराचे आहोत, असे भासविण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला रिपब्लिकन पक्षातील एक तरी गट घ्यावा लागतोच. पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि दादासाहेब गायकवाड यांच्या युतीपासून ही परंपरा सुरु झाली, ती पुढे रा.सू. गवई व रामदास आठवले यांनी चालू ठेवली. हा दलितांची मते मिळविण्याचा एक हुकमी मार्ग होता. राष्ट्रवादीनेही तोच मार्ग चोखळला. परंतु या वेळी मात्र दोन्ही काँग्रेसमध्ये रिपब्लिकन गटांना बरोबर घेण्याबाबत उदासीनता दिसत आहे.
ठाकूर – आंबेडकरांचा काँग्रेसला ठेंगा
राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी कायम ठेवतानाच अकोल्यात प्रकाश आंबेडकर आणि पालघरमध्ये हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षांना जागा सोडण्याची तयारी काँग्रेसने दर्शविली असली तरी आंबेडकर यांनी वेगळी वाट स्वीकारली. तर पालघरमध्ये ठाकूर हे काँग्रेसच्या अटीवर लढण्यास तयार नाहीत. पालघरमध्ये गेल्या वेळी हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन आघाडीचे बाळाराम जाधव निवडून आले होते. गेली पाच वर्षे जाधव काँग्रेसबरोबर राहिले. तसेच राज्य विधानसभेतील त्यांच्या दोन्ही आमदारांचा काँग्रेसला पाठिंबा आहे. विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसला मदत केली होती़