केंद्र सरकारकडे प्रलंबित असलेले वन आणि पर्यावरण विभागाचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमवेत लवकरच बैठक घेणार असल्याचे केंद्रीय वन-पर्यावरण आणि माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी रविवारी सांगितले.
केंद्रीय मंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रथमच पुण्यात आलेल्या जावडेकर यांनी पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालापामध्ये ही माहिती दिली. संघाचे अध्यक्ष संतोष कुलकर्णी आणि सरचिटणीस राजा पाटील उपस्थित होते.
देशाने सुशानासाठी ऐतिहासिक कौल दिला आहे. सगळ्या मंत्र्यांनी विषय नीट समजून घेत वेगाने कामाला लागावे ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अपेक्षा असल्याचे सांगून जावडेकर म्हणाले, वन आणि पर्यावरण विभाग हा प्रगती थांबविणारा असाच गैरसमज आहे. पण, वस्तुस्थिती तशी नाही. संरक्षण विभागाचे प्रश्न मंत्रालयाकडे प्रलंबित आहेत. पर्यावरण मंत्रालयाची परवानगी नसल्याने क्षेपणास्त्र विकसनाचा कोर्यक्रम होऊ शकत नाही. बंदरे आणि विमानतळाचेही काही प्रश्न मंत्रालयाशी संबंधित आहेत. विकास आणि पर्यावरण संरक्षणाचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला जाईल.
पुण्यातील आठही आमदार महायुतीचे
पुणे शहरातील आठही आमदार भाजप-शिवसेना महायुतीचे असतील यासाठी आपण चार महिने लक्ष केंद्रित करणार असल्याचे केंद्रीय वन-पर्यावरण आणि माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. भाजप कार्यालयामध्ये शहराध्यक्ष आणि खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते जावडेकर यांचा सत्कार करण्यात आला.

Story img Loader