लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील तिसऱ्या व अखेरच्या टप्प्यातील मतदान गुरुवारी होत आहे. प्रत्यक्ष निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या भवितव्याबरोबरच रिंगणाबाहेरच्या प्रस्थापित राजकारण्यांचीही प्रतिष्ठा पणाला लावणारी ही निवडणूक आहे. त्यात शरद पवार, नारायण राणे, पतंगराव कदम, बाळासाहेब विखे-पाटील, बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे आर.आर.पाटील, गणेश नाईक, एकनाथ खडसे, रामदास आठवले, डॉ. विजयकुमार गावित आदी नेत्यांचा समावेश आहे.
काँग्रेसमधील दुसरे एक तहहयात मुख्यमंत्रीपदाचे दावेदार पतंगराव कदम यांचे पुत्र विश्वजित कदम पुण्यातून राजकीय भवितव्य अजमावत आहेत. पतंगरावांचेही राजकीय स्थान ठरविणारी ही निवडणूक आहे. गणेश नाईक यांचे पुत्र संजीव नाईक यांची निवडणूक गणेश नाईक यांना राजकीय संजीवनी देणारी ठरणार आहे. अर्थात निकाल काय लागणार, त्यावरच सारे ठरणार आहे.
विधानसभेतील विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसेही रिंगणात आहेत. खडसे यांच्या राजकारणाला वळण देणारी ही निवडणूक आहे.
काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे-पाटील यांच्या इशाऱ्यावर नगरचे राजकारण चालते, असे मानले जाते. शिर्डी मतदारसंघात भाऊसाहेब वाघचौरे हे त्यांचे उमेदवार आहेत. विखे-पाटील यांची प्रतिष्ठा या मतदारसंघात पणाला लागली आहे. नगरमध्ये बाळासाहेब थोरात यांचे भाचे राजीव राजळे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. राजळे यांच्या जय-पराजयावर विखे-थोरात यांच्यातील वर्चस्वाच्या राजकारणा निकाल लागणार आहे.
सांगलीत काँग्रेसचे उमेदवार प्रतीक पाटील आहेत. परंतु आर. आर. पाटील यांचे कट्टर विरोधक संजयकाका पाटील यांनी त्यांना आव्हान दिले आहे. त्यामुळे सांगलीतील निवडणूक आबांसाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. महायुतीतील रिपब्लिकन पक्षाला सातारा ही एकच जागा मिळाली आहे. त्या ठिकाणी उदयन राजे यांच्याशी टक्कर देणे सोपे नाही. रिपाइंच्या उमेदवाराचा केविलवाणा पराभवही आठवले यांच्या पुढील राजकीय वाटचासाठी अडचणीचा ठरू शकतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा