निवडणुकांच्या कामासाठी मुख्याध्यापकांना यंदा केंद्रप्रमुखांऐवजी विभाग अधिकारी पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यामुळे दहावी-बारावीच्या निकालाबरोबरच शाळेतील पहिली ते नववीच्या वेळापत्रकांचाही बोजा उडणार असल्याची भीती मुख्याध्यापक व्यक्त करीत आहेत.
निवडणुका आल्या की ती कामे करणे शिक्षकांना क्रमप्राप्तच असते. यामध्ये मुख्याध्यापकांना नेहमी केंद्रप्रमुखांची जबाबदारी सोपविली जाते. पण यंदा मुख्याध्यापकांवर संपूर्ण विभागाची जबाबदारी सोपविली जाणार आहे. यामध्ये मुख्याध्यापकांना किमान १० ते १५ दिवस संपूर्ण वेळ निवडणुकीच्या कामांना द्यावा लागणार आहे. केंद्रप्रमुखाची जबाबदारी असताना मुख्याध्यापकांना तीन दिवस पूर्णवेळ निवडणुकीच्या कामासाठी द्यावा लागत होता. पण यंदा जबाबदारी वाढविल्यामुळे मुख्याध्यापकाला विभागातील १५ ते १६ केंद्रांवर नजर ठेवावी लागणार आहे. निवडणुकांच्या काळात पूर्णवेळ ही कामे करावी लागणार आहेत. परिणामी शाळांमधील पहिली ते नववीच्या निकालांच्या कामावर परीणाम होण्याची शक्यता असल्याचे मुंबई म्रुख्याध्यापक संघटनेचे उपाध्यक्ष प्रशांत रेडीज यांनी स्पष्ट केले.
मुख्याध्यापकांना विभागीय अधिकारी केल्यामुळे त्यांना निकालाच्या दिवशीही उपस्थित राहणे बंधनकारक  असणार आहे. निकालाचे काम वेळेत पूर्ण करावयाचे असेल तर शाळांना परीक्षा मार्च महिन्यातच संपवाव्या लागणार आहेत. तसे निर्देशही महापालिकेने दिल्याचे समजते. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याचीही भीती आहे, असेही ते म्हणाले. शिक्षण हक्क कायद्यानुसार शिक्षकांना केवळ निवडणुकीच्या प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी काम द्यावे, असे नमूद केलेले असतानाही मुख्याध्यापकांवर ही जबाबदारी देण्यात आली आहे. यामुळे या संदर्भात आम्ही बुधवारी शिक्षण सचिवांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही रेडीज म्हणाले.

Story img Loader