भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची कुठेच लाट वा हवा जाणवत नाही, पण राज्यातही मोदींचे आव्हान आहे, अशी कबुलीच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. त्यामुळेच जातीयवादी शक्तीशी लढण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने भक्कम आघाडी केली आहे, असा दावाही त्यांनी केला.
मुंबई काँग्रेसच्या वतीने शनिवारी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात पत्रकारांशी संवाद साधताना, या निवडणुकीत भाजपने पहिल्यांदाच आमच्यासमोर गंभीर आव्हान उभे केले आहे, अशी कबुली मुख्यमंत्र्यांनी दिली. २००४ व २००९ मध्ये दोन्ही काँग्रेसची युती होती, परंतु अंतर्गत कुरघोडी व शह-काटशहाचे राजकारणही झाले. परंतु या वेळी १९९९ पूर्वी म्हणजे राष्ट्रवादीच्या निर्मितीच्या आधी ज्या प्रमाणे एकसंध काँग्रेस होती, तशी आता अभेद्य आघाडी झाल्याचा दावा त्यांनी केला.
महाराष्ट्रात आम आदमी पक्षाने अनेक ठिकाणी आपले उमेदवार उभे केले असले तरी, त्याचा काही फारसा परिणाम होईल, असे आपणास वाटत नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. या कार्यक्रमाला मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, मुंबईचे अध्यक्ष प्रा. जनार्दन चांदूरकर तसेच पक्षाचे आमदार व पदाधिकारी उपस्थित होते.
भाजप-मनसेत खासगी युती
एका बाजूला भाजपचे आव्हान आहे, असे सांगत असताना विरोधी पक्षांमधील विसंवादावरही मुख्यमंत्र्यांनी बोट ठेवले. विरोधकांमध्ये काही ठिकाणी युत्यांमध्ये युत्या झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. भाजप व मनसेचे नाव न घेता या दोन पक्षांमध्ये खाजगी समझोता झाल्याची टिप्पणी त्यांनी केली.
चांदूरकरासाठी मुख्यमंत्र्यांची माफी
मुंबई काँग्रेसच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता. मुंबई काँग्रेसने पत्रकारांना जेवायला बोलावले नव्हते म्हणून हा कार्यक्रम आयोजित केल्याचे विधान करुन जनार्दन चांदूरकर यांनी नमनालाच गोंधळ उडवून दिला. त्याला पत्रकारांनी जोरदार आक्षेप घेतल्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केली. त्यांच्यानंतर मोहन प्रकाश व चांदूरकर यांनीही पत्रकारांची माफी मागितली आणि बिनडोक विधानामुळे निर्माण झालेल्या विसंवादावर पडदा टाकून संवादाला सुरुवात केली.
निवडणुकीत मोदींचे आव्हान!
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची कुठेच लाट वा हवा जाणवत नाही, पण राज्यातही मोदींचे आव्हान आहे, अशी कबुलीच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have a account? Sign in
First published on: 30-03-2014 at 01:54 IST
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prithviraj chavan calls modi a challenge in election