विधान परिषदेच्या निवडणुकीत नऊ जागांसाठी दहा अर्ज दाखल झाल्याने चुरस वाढली आहे. सर्वच पक्ष जोर लावणार असल्याने घोडेबाजार होण्याची शक्यता लक्षात घेऊनच ही निवडणूक बिनविरोध व्हावी या दृष्टीने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीच पुढाकार घेतला आहे. राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेनेला बाहेरून मतांची बेगमी करावी लागणार असल्याने यापैकी कोणाचा तरी एक उमेदवार अडचणीत येऊ शकतो.
नऊ जागांसाठी पहिल्या पसंतीची २९ मते विजयाकरिता आवश्यक आहेत. संख्याबळाच्या आधारे काँग्रेसचे तीन, राष्ट्रवादीचे दोन तर युतीचे तीन उमेदवार पहिल्या फेरीत निवडून येऊ शकतात. तिसरा उमेदवार उभ्या केलेल्या राष्ट्रवादीला तिसरा उमेदवार निवडून आणण्याकरिता २५ अतिरिक्त मतांची आवश्यकता आहे. युतीचे तीन उमेदवार निवडून येऊ शकत असले तरी शिवसेना आणि भाजप या दोघांनीही प्रत्येकी दोन उमेदवार रिंगणात ठेवल्याने चुरस वाढली आहे. गुप्त मतदान पद्धतीने ही निवडणूक होत असल्याने घोडेबाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे लक्षात घेऊनच २०१२ प्रमाणेच यंदाही निवडणूक बिनविरोध व्हावी, असा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न आहे. या संदर्भात आपण विरोध नेत्यांशी चर्चा करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
राष्ट्रवादीची मदार अपक्षांवर
राष्ट्रवादीकडे ६२ मते असून, १२ अपक्षांचा या पक्षाला पाठिंबा आहे. परिणामी आणखी १३ मतांची आवश्यकता भासणार आहे. मनसेच्या मतांवरही राष्ट्रवादीचा डोळा आहे. मतांच्या फोडोफोडीत राष्ट्रवादीचे नेते माहिर असल्याने तिसरा उमेदवार निवडून आणण्यात राष्ट्रवादीला फारशी अडचण येणार नाही, अशी चिन्हे आहेत.
काँग्रेसमध्ये धाकधूक
काँग्रेसच्या आमदारांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या कडक भूमिकेमुळे काहीशी नाराजी आहे. सहा वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या मतांमध्ये फाटाफूट झाल्यानेच पक्षाचा एक उमेदवार पराभूत झाला होता. पक्षाकडे ८२ मते असल्याने पाचच अतिरिक्त मते लागणार आहेत. तरीही पक्ष सावध आहे. अपक्ष आणि छोटय़ा पक्षांचे पाठबळ लक्षात घेता तिन्ही उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतात. मात्र काँग्रेसचे नेते कोणताही धोका पत्करण्यास तयार नाहीत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा