भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवीत असून तेथे आपण प्रचाराला जाणार नाही, असे काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या कन्या प्रियंका गांधी-वढेरा यांनी म्हटले आहे.
आपण वाराणसीमध्ये जाणार नाही, रायबरेली आणि अमेठी या दोनच मतदारसंघांत आपण प्रचार करणार, असे प्रियंका यांनी स्पष्ट केले. वाराणसीतून काँग्रेसचे अजय राय हे मोदी यांच्या विरोधात रिंगणात आहेत. प्रियंका गांधी-वढेरा या वाराणसीत प्रचार करण्यासाठी जाणार असल्याचे संकेत मीडियातील वृत्तांमधून देण्यात आले होते. त्याबाबत प्रियंका यांनी वरील स्पष्टीकरण दिले आहे.
वाराणसी मतदारसंघातून मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढण्याची तयारी प्रियंका यांनी दर्शविली होती, मात्र पक्षश्रेष्ठींनी त्यांना थांबविले, या वृत्ताचेही अलीकडेच प्रियंका यांनी जोरदार खंडन केले होते. निवडणूक न लढविण्याचा निर्णय आपलाच होता, निवडणूक लढविली असती तर आपल्या कुटुंबीयांनी आपल्याला संपूर्ण मदत केली असती, असेही प्रियंका म्हणाल्या.

Story img Loader