पुणे या काँग्रेसच्या परंपरागत बालेकिल्ल्यातील निवडणुकीची या वेळी दोन ठळक वैशिष्टय़े दिसत आहेत. यंदा पुण्यात तिरंगी लढत होत आहे आणि अनेक वर्षांनंतर या वेळी काँग्रेस कलमाडींशिवाय मैदानात उतरली आहे. पुण्यातील सर्व मातब्बर इच्छुकांना डावलून राहुल ब्रिगेडकडून या वेळी विश्वजित कदम यांना पुण्यातून उमेदवारी देण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षातही आमदार गिरीश बापट आणि अनिल शिरोळे यांच्यात उमेदवारीसाठी मोठी स्पर्धा झाली आणि अखेर शिरोळे यांनाच पुन्हा संधी देण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे २९ नगरसेवक २०१२ साली झालेल्या महापालिका निवडणुकीत पुणेकरांनी निवडून दिले. त्यामुळे मनसेलाही पुण्यातून आशा वाटत आहे. दीपक पायगुडे यांच्या रूपाने राजकारणातील अनुभवी उमेदवार मनसेने पुण्यात दिला आहे. आम आदमी पक्षाचे प्रा. सुभाष वारे हेही मैदानात असून माजी सनदी अधिकारी अरुण भाटिया असे सर्व मिळून एकोणतीस उमेदवार खासदारकीची निवडणूक पुण्यातून लढवत आहेत.
कदम यांच्यासाठी तरुण वय आणि स्वच्छ प्रतिमा हे दोन मुद्दे अनुकूल आहेत. त्याबरोबरच पुण्याची काँग्रेस त्यांना स्वीकारणार का आणि काँग्रेसजन त्यांच्या विजयासाठी प्रयत्न करणार का, हे दोन प्रश्नही त्यांच्यापुढे आहेत. स्वच्छ प्रतिमा, मोदी यांची सभा आणि आरपीआयची साथ हे मुद्दे शिरोळे यांच्यासाठी अनुकूल आहेत, तर पक्षातील गटबाजी हा त्यांच्यासाठी अडचणीचा मुद्दा आहे. पायगुडे कसलेले राजकारणी आहेत आणि त्यांचा लोकसंपर्कही दांडगा आहे. त्याबरोबरच पक्षातील गटबाजी आणि गेली दहा वर्षे राजकारणात सक्रिय नसल्याचा मुद्दा त्यांना काहीसा अडचणीचा ठरत आहे.
वडगावशेरी, कॅन्टोन्मेंट, कसबा, कोथरूड, पर्वती आणि शिवाजीनगर हे सहा विधानसभा मतदारसंघ पुणे लोकसभा मतदारसंघात येतात. त्यातील तीन युतीकडे आणि तीन काँग्रेस आघाडीकडे आहेत. तिरंगी लढत पुण्यात अनेक वर्षांनी होत आहे. काँग्रेस विरुद्ध भाजप या पारंपरिक लढतीत यंदा मनसेही उतरल्यामुळे लढत चुरशीची झाली आहे आणि यामुळे युती व काँग्रेसच्या सर्व आमदारांवर आता त्यांच्या मतदारसंघात त्यांच्या पक्षाला मोठे मताधिक्य देण्याची जबाबदारी आली आहे.
कॅन्टोन्मेंट, शिवाजीनगर आणि वडगावशेरी या तीन मतदारसंघांवर काँग्रेसची खरी भिस्त आहे आणि शिरोळे यांना विजयासाठी पर्वती, कसबा व कोथरूडमध्ये मोठे मताधिक्य मिळवावे लागणार आहे.
अन्य तीन मतदारसंघांत जी पिछाडी मिळेल ती भरून काढण्यासाठी मताधिक्य मिळवून देणारे तीन मतदारसंघ उपयोगी पडतील, असे दोन्ही पक्षांचे गणित आहे. या गणितात आता मनसे हा नवा वाटेकरी पक्ष आला आहे. त्यामुळे मनसेला कोणत्या मतदारसंघात किती मते पडतील यावर विजयाचे गणित इकडेतिकडे सरकणार आहे. काँग्रेसला मताधिक्य देणाऱ्या मतदारसंघात जर मनसेला चांगली मते मिळाली, तर ते शिरोळे यांच्यासाठी फायद्याचे ठरेल; पण युतीच्याच मतदारसंघात मनसेचे इंजिन चालले, तर त्याचा फटका शिरोळे यांना बसू शकतो.
माझ्या उमेदवारीबाबत विविध मुद्दे उपस्थित करण्यात आले. तरीही माझा प्रचार विकासाच्या मुद्दय़ावरच राहील. निवडून आल्यानंतर पुण्यातील मेट्रो प्रकल्प मार्गी लावणे, वाहतुकीची र्सवकष सुधारणा, रोजगारनिर्मितीला चालना हे माझे प्राधान्याचे मुद्दे राहतील. पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांची साथ प्रचारात मिळत आहे आणि पुणे हा पूर्वीपासून जसा काँग्रेसकडे असलेला मतदारसंघ आहे, तसाच तो पुढेही राहील असा माझा विश्वास आहे.
विश्वजित कदम, काँग्रेस</p>
भारतीय जनता पक्षाने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे आणि त्याच पक्षाचा मी पुण्यातील प्रतिनिधी आहे. त्यामुळे मोदींसाठी ज्यांना मत द्यायचे आहे ते नक्कीच भाजपला मतदान करतील. काँग्रेसचा कारभार, त्यांच्या खासदारांनी गेल्या पाच वर्षांत पुण्यात केलेले काम आणि त्या पाश्र्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे काम आम्ही पुणेकरांसमोर मांडले आहे. त्यातून पुणेकर निश्चितपणे भाजपचीच निवड करतील.
अनिल शिरोळे, भारतीय जनता पक्ष
विश्वजित कदम हे पुण्याचे मतदारच नाहीत, तर ते पुण्याचे खासदार कसे? पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवडून येणार असल्यामुळेच राज ठाकरे यांनी पुण्यातून मला उमेदवारी दिली आहे आणि विजय निश्चित आहे. पुण्याची वाहतूक आणि सर्वसामान्यांसाठी घरे हे दोन प्रश्न सातत्याने जाणवत आहेत. निवडून आल्यानंतर ते सोडवण्यावर माझा भर राहील आणि माझे सामाजिक कार्यही सुरू राहील.
दीपक पायगुडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना