राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते लालूप्रसाद यादव यांनी येथे एका जाहीर सभेत आपल्या पत्नी राबडीदेवी यांच्या गळ्यात वरमाला घालून त्यांच्याकडे सरण लोकसभा मतदारसंघाची धुरा प्रतिकात्मक पद्धतीने सुपूर्द केली.
आपला विवाह १९७०च्या दशकात झाला आणि त्यावेळी वरमाला घालण्याची पद्धत नव्हती, त्यामुळे ती कसर आपण आता भरून काढत आहोत, असे लालूप्रसाद यादव यांनी भोजपुरी भाषेत सांगताच उपस्थितांमध्ये हास्यस्फोटच झाला. या वेळी लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप व्यासपीठावर उपस्थित होते.
चारा घोटाळ्यात दोषी ठरलेल्या लालूप्रसाद यांना लोकसभा सदस्य म्हणून अपात्र घोषित करण्यात आले असून, त्यांच्यावर ११ वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे त्यांनी आपली पत्नी राबडीदेवी यांना सरणमधून उमेदवारी दिली आहे.