पराभवाचे खापर राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांवर फोडून पक्षात खळबळ उडवून देणाऱ्या मिलिंद देवरा यांना पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, दिग्विजय सिंग, राजीव सातव यांच्यासह अनेक नेत्यांनी चांगलीच चपराक दिली. परिणामी सुरुवातीला देवरा यांच्या मताशी सहमत असलेले नेतेही गप्प झाल्याने देवरा पक्षात एकाकी पडले.
काँग्रेसच्या वर्तुळात मिलिंद देवरा हे राहुल गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात. त्यांच्यामुळेच त्यांना राज्यमंत्रीपदही मिळाले होते. राहुल गांधी यांच्याशी असलेल्या घनिष्ट संबंधामुळेच पक्षातील बडे नेतेही मिलिंद देवरा यांच्यापासूनच दूर राहण्याचा प्रयत्न करीत. पराभवानंतर त्यांनी राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांना लक्ष्य केल्याने पक्षात प्रतिक्रिया उमटली. राहुल यांच्या जवळच्यानेच तोंड उघडल्याने पक्षात आश्चर्य व्यक्त करण्यात येऊ लागले. राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांना लक्ष्य करण्याच्या देवरा यांच्या मताशी पक्षातील अनेक नेते सहमत होते.
देवरा यांच्यावर अ. भा. युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजीव सातव यांनी टीका केल्याने पक्षात वेगळा संदेश गेला. राहुल यांच्या इशाऱ्याशिवाय सातव यांची प्रतिक्रिया अशक्यच असते. जाहीरपणे मतप्रदर्शन करण्याचे टाळा हा सोनिया गांधी यांचा संदेशही देवरा यांना उद्देशूनच होता. दिग्विजय सिंग यांनीही मिलिंद देवरा यांच्यावर टीका केली. मंत्रिपदी असताना हेच देवरा राहुल यांच्या कायम संपर्कात असायचे, असे सिंग यांनी म्हटले आहे. राहुल यांच्या बचावासाठी नेतेमंडळी पुढे आल्याने पक्षात राहुल यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेले नेतेही आपोआप गप्प बसले.
काहीही स्वकर्तृत्व नसताना थेट खासदारकी आणि नंतर राज्यमंत्रीपद मिळालेल्या मिलिंद देवरा यांनी पक्षवाढीसाठी काय केले, असा सवाल मुंबईतील कार्यकर्ते करू लागले आहेत. मुरली देवरा यांचे गांधी घराण्याशी नेहमीच घनिष्ठ संबंध राहिले. प्रकृती तेवढी साथ देत नसतानाही पक्षाने नुकतीच त्यांना राज्यसभेसाठी पुन्हा संधी दिली. तरीही मिलिंद देवरा यांनी राहुल यांच्या टीमवर निशाणा साधल्याने पक्षात आश्चर्य व्यक्त केले जाते.
दक्षिण मुंबई मतदारसंघातील पराभवामुळे अस्वस्थ झालेल्या देवरा यांनी अप्रत्यक्षपणे राहुल गांधी यांनाच दोष दिल्याने पक्षाची नाराजी ओढवून घेतली. पक्षाने चांगलीच चपराक दिल्याने त्यांची टिवटिव बंद होईल, अशी प्रतिक्रिया मुंबईतील कार्यकर्ते व्यक्त करू लागले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा