रेल्वेच्या प्रवासी आणि मालवाहू दरात वाढ करण्याचा निर्णय अत्यंत कठीण असला तरी तो योग्य निर्णय आहे, असे मत व्यक्त करून केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शनिवारी या दरवाढीचे जोरदार समर्थन केले.
रेल्वे प्रवाशांनी अधिकाधिक महसूल दिला तरच त्यांना अधिक चांगल्या सुविधा देता येतील आणि रेल्वेचा कारभार तरून जाईल, असेही जेटली यांनी म्हटले आहे. रेल्वेला कर्जाच्या खाईत लोटावयाचे की दरवाढ करावयाची हे दोनच पर्याय सरकारपुढे होते, असेही ते म्हणाले.
आपल्याला जागतिक दर्जाची रेल्वेसेवा हवी आहे की मोडकळीस आलेली, याचा निर्णय देशवासीयांनी घ्यावयाचा आहे. त्यामुळे रेल्वेमंत्र्यांनी घेतलेला दरवाढीचा निर्णय कठीण असला तरी तो योग्य आहे, असेही ते म्हणाले. गेल्या काही वर्षांपासून रेल्वे तोटय़ातच होती. त्यामुळे दरवाढ हाच पर्याय होता, असेही ते म्हणाले.
करुणानिधींची टीका
रेल्वे दरवाढीवरून द्रमुकचे नेते एम. करुणानिधी यांनी भाजपच्या सरकारवर जोरदार टीका केली आहे. यूपीए सरकारने पाडलेले चुकीचे पायंडे सुधारण्याचे आश्वासन भाजपने दिले होते, मात्र काही प्रश्नांबाबत भाजपचा दृष्टिकोन यूपीएसारखाच असल्याचे करुणानिधी यांनी म्हटले आहे.तामिळनाडूतील भाजपचे घटक पक्ष असलेल्या एमडीएमके आणि डीएमडीके यांनीही दरवाढ रद्द करण्याची मागणी केली आहे.केंद्र सरकारने ही दरवाढ त्वरित रद्द करून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा आणि जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ रोखावी, असेही करुणानिधी म्हणाले.

Story img Loader