नरेंद्र मोदी यांचे काम चांगले आहे. त्यामुळे माझे खासदार पंतप्रधान म्हणून मोदींनाच पाठिंबा देतील, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली. त्याचवेळी ‘मोदींचा मुखवटा घालून मत मागण्याची मला गरज नाही. उलट मीच २०१०मध्ये सर्वात आधी मोदी पंतप्रधान व्हायला हवेत असे म्हणालो होतो,’ असे सांगत राज यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
‘मी कुणाला पाडण्यासाठी किंवा निवडून आणण्यासाठी उमेदवार उभे केलेले नाहीत. माझे खासदार निवडून येणारच आणि ते पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देणार. देशाला कणखर आणि खंबीर नेतृत्व मोदीच देऊ शकतात,’ असे राज यांनी म्हटले. मोदींना पाठिंबा जाहीर केल्यानंतर उद्धव यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले,‘२०१०मध्ये मी गुजरातमध्ये जाऊन आलो आणि तेव्हाच मोदींचे काम पाहून ते देशाचे पंतप्रधान झाले पाहिजेत, असे म्हणालो. ‘यांच्या’सारखा दांभिकपणा मी करत नाही.’
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची खिल्ली उडवताना ‘हात हलवतो की टेम्पो धुतो हे कळत नाही,’ असे ते म्हणाले. काँग्रेस मनातून पूर्णपणे हरली आहे. केवळ निवडणुकीचा निकाल यायचा शिल्लक आहे, असे ते म्हणाले. निवडणुका आल्या की काँग्रेसवाले शिवाजीमहाराजांच्या स्मारकाचा विषय पुढे करतात, असा आरोप त्यांनी केला. स्मारकासाठी ४-५ हजार कोटी खर्च करण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे जतन करण्यासाठी १० हजार कोटी रुपये खर्च करा, अशी टिपणी त्यांनी केली.
गजानन बाबर मनसेत
विद्यमान खासदार असूनही उमेदवारी नाकारल्याने संतापलेल्या गजानन बाबर यांनी सेनेला ‘जय महाराष्ट्र’ करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. बाबर व त्यांच्या समर्थकांच्या मनसे प्रवेशाने मावळ लोकसभेची तसेच िपपरी-चिंचवड शहरातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.