राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार, गणेश नाईक आणि छगन भुजबळ यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांकडून केवळ घराणेशाहीचे राजकारण सुरू आहे. सर्व काही यांच्या घरातच द्यायचे काय, असा प्रश्न करत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संबंधितांची घराणेशाही मोडून काढण्याचे आवाहन केले. नाशिक लोकसभा मतदार संघातील मनसेचे उमेदवार डॉ. प्रदीप पवार यांच्या प्रचाराचा नारळ शनिवारी सायंकाळी घोटी येथे आयोजित जाहीर सभेद्वारे फोडण्यात आला. यावेळी राज यांनी शिवसेना व त्यातही उध्दव ठाकरे यांच्याविषयी कोणतीही टिप्पणी केली नाही.
अवकाळी पाऊस व गारपिटीनंतर केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विदर्भाच्या दौऱ्यावर सोबत गेले होते. परंतु, त्या ठिकाणी पवार यांनी केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतदार संघात तर मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या मतदार संघात पाहणी केली. यावरून हे दोन्ही नेते केवळ आपल्याला मते मिळतील, त्याच भागात प्रामुख्याने फिरल्याचे राज यांनी सांगितले. यावेळी परप्रांतीयांच्या मुद्याकडे त्यांनी लक्ष वेधले. परप्रांतातून येणाऱ्या लोंढय़ांमुळे महाराष्ट्रातील शहरांची अवस्था बिकट झाली आहे. परप्रांतीय मंडळी आता केवळ रोजगारासाठी महाराष्ट्रात येत नाहीत तर, ते या ठिकाणी आपला मतदारसंघ बांधत आहेत. एकाचवेळी दोन मतदार संघातून निवडून येणारे अबु आझमी हे त्याचे उदाहरण. राष्ट्रवादीचे काही नेते परप्रांतीयांना पायघडय़ा घालत असल्याचा आरोपही राज यांनी केला. मराठी मतदारांना काँग्रेस व राष्ट्रवादीने नेहमी गृहीत धरले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत मराठी मतदारांनी दोन्ही काँग्रेसला त्यांची जागा दाखवून द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची खिल्ली उडवत राज यांनी या पोरग्याला देशाचे पंतप्रधान करायचे का, असा खोचक प्रश्न उपस्थित केला. पंतप्रधान पदासाठी भाजपचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना मनसेचा पाठिंबा असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. काँग्रेस व राष्ट्रवादीवर टिकास्त्र सोडताना राज यांनी शिवसेना व उध्दव ठाकरे यांच्याबद्दल मौन बाळगणे पसंत केले.

Story img Loader