भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा करिष्मा आणि ‘आप’ची महाराष्ट्रातील वाटचाल लक्षात घेऊन लोकसभेच्या निवडक जागा लढवून यश मिळविण्याच्या ‘राज’नीतीमुळे यंदाही लोकसभा निवडणुकीत मनसे पुन्हा एकदा वादळ निर्माण करणार हे स्पष्ट झाले आहे.  प्रचाराची पहिली सभा पुण्यात घेऊन राज ठाकरे प्रचाराची तोफ डागतील.
आठ वर्षांचा पक्ष आणि लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीतील अनुभवाच्या पाश्र्वभूमीवर राज ठाकरे लोकसभा निवडणुकीसाठी जास्तीत जास्त जागा लढवतील असा अंदाज होता. पण या समजाला छेद देत यावेळीही निवडक जागा लढवून शिवसेनेला दणका देण्याची तयारी करत लोकसभेत खाते उघडण्याची तयारी राज यांनी चालवली आहे. त्यामुळे मनसेचे उमेदवार असलेल्या लोकसभा मतदारसंघात प्रत्येकी किमान तीन सभा घेण्याची तयारी राज ठाकरे यांनी सुरू केली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतील सहाही जागा लढवताना मनसेने तीन महिला उमेदवार दिले होते तर महाराष्ट्रात एकूण पाच महिलांना उमेदवारी दिली होती. गेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेने लोकसभेच्या बारा जागा लढविल्या होत्या तर यावेळी अद्यापि एकही महिला उमेदवार जाहीर केलेला नसून दहा जागांवर उमेदवारी घोषित केली आहे. उत्तर मुंबईत मनसेचा एक आमदार तर ईशान्य मुंबईत तीन आमदार असूनही येथून मनसेने एकही उमेदवार न दिल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. पण पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्याच्या राज यांच्या रणनीतीचाच हा एक भाग असल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचेम्हणणे आहे. राज यांच्या या धोरणाचा फायदा मुंबई व ठाण्यातील अन्य लोकसभा मतदार संघात ज्या ठिकाणी मनसेचे उमेदवार शिवसेनेच्या विरोधात लढत आहे, तेथे झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही मनसेकडून व्यक्त केला जात आहे. पुणे येथे मनसेचे खंदे सरचिटणीस दीपक पायगुडे यांना उमेदवारी देऊन ३१ मार्च रोजी पुण्यातून प्रचाराची पहिली सभा राज घेणार आहेत. पुण्यातील नदीपात्रात होणाऱ्या या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आघाडीच्या कारभाराचे वाभाडे राज ठाकरे काढतील, असेही सूत्रांनी सांगितले.
 निवडक जागा लढवत असल्यामुळे राज यांच्या झंजावाती प्रचारसभांमुळे मनसेला किमान तीन जागा मिळतील असा विश्वासही ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. पुणे, कल्याण-डोंबिवली आणि नाशिकमध्ये मनसेला वातावरण अनुकूल असून दक्षिण मुंबई, ठाणे आणि यवतमाळ येथे कडवी लढत होईल, असे राज यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे.

Story img Loader