‘स्वर्गीय सन्माननिय बाळासाहेब ठाकरे आजारी असताना मी पाठवलेले तेवढेच सूप घेत होते तेव्हा त्यांना का वाटले नाही की पाठीत खंजिर खुपसला?’ असा सवाल उपस्थित करत राज ठाकरे यांनी फक्त उध्दव ठाकरेंनाच खंजिर खुपसल्या सारखे कसे काय वाटले? असे म्हटले.
उध्दव ठाकरेंनी केलेल्या प्रश्नांची राज ठाकरे यांनी भावनिक उत्तरे यावेळी दिली. तसेच अनेक गौप्यस्फोटही केले. ते डोंबिवलीतील जाहीर सभेत बोलत होते.
राज म्हणाले की, “उध्दव ठाकरे रुग्णालयात अॅडमिट असल्याचे समजले होते. तेव्हा मी स्वत: फोन करून तेथे आलो तर चालेल का असे विचारले आणि समोरून हरकत नसल्याचे उत्तर आले. त्यानंतर खुद्द बाळासाहेबांचाही फोन आला आणि मला तातडीने रुग्णालयात बोलावले. मी निघालोय असे उत्तर देऊन थेट रुग्णालय गाठले. तेव्हा मी खंजीर खुपसणारा वाटलो असेन मग, बाळासाहेबांनी मलाच का फोन केला?” असा सवाल राज यांनी उपस्थित केला.
“त्यानंतर रुग्णालयातून मातोश्रीवर एकाच कार मधून येत असताना उध्दवांना तेव्हा वाटले नाही की, बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसणारा बाजूला बसलाय.” अशी खरमरीत टीकाही राज यांनी यावेळी केली. तसेच उध्दव यांच्या नादानपणामुळेच शिवसेना सोडल्याचेही राज म्हणाले.
टोलवाढीवर टीकास्त्र-
टोलवाढीवरून आघाडी सरकारवर निशाणा साधत राज म्हणाले की, नुकताच महामार्गांवरील टोल १८ टक्क्यांनी वाढविला असल्याचे समजले. आचारसंहीता संपूद्या मग टोलचे काय करायचे ते बघतो असे थेट इशारा राज यांनी दिला. मुख्यमंत्र्यांशी झालेल्या भेटीनंतरही आश्वासने दिलेले टोल बंद झाले नसल्यावरही राज यांनी टीका केली.
त्याचबरोबर राज यांनी यावेळीही जनतेला टोल न भरण्याचे आवाहन केले. राज म्हणाले की, कुठेही टोल भरायचा नाही. टोलवर वाहनांच्या रांगा लागल्या तरी चालतील..पुढे काय करायचे हे तुम्हाला माहिती आहे” असेही ते म्हणाले.
बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या मुद्दाचा वेध-
राज यांनी आपल्या भाषणात बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या मुद्द्यावरही आपले मत स्पष्ट केले. बाबासाहेबांचे स्मारक व्हावे याला विरोध नाही. फक्त स्मारक जनतेसाठी असावे. तसेच स्मारकापेक्षा बाबासाहेबांच्या नावाने भव्य वाचानालय बांधण्यावर भर द्यावा असेही राज म्हणाले.