नवी मुंबई महापालिकेत नाईक कुटुंबियांमार्फत ठेकेदारांकडून कोऱ्या धनादेशाद्वारे पाच टक्के घेतल्याचा आरोप करणाऱ्या शिवसेनेला मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसने नंदलाल समितीची आठवण करून देत ठाणे महापालिकेत ४१ टक्क्य़ांचा भ्रष्टाचार कुणी केला याचे आधी उत्तर द्या, असा प्रतिसवाल केला. स्थायी समितीत झालेल्या ४१ टक्के भ्रष्टाचार प्रकरणी नेमण्यात आलेल्या नंदलाल समितीने शिवसेनेचे विद्यमान आमदार राजन विचारे यांच्यावरही ठपका ठेवत त्यांनाही आरोपी केले होते, असा आरोपही यावेळी करण्यात आला.
शिवसेनेत दाखल झालेले नवी मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त विजय नाहटा यांनी सोमवारी पत्रकर परिषद घेऊन जिल्ह्य़ाचे पालकमंत्री गणेश नाईक आणि त्यांच्या कुटुंबावर टक्केवारीचे आरोप केले होते. या आरोपाचे खंडन करत राष्ट्रवादीने मंगळवारी शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांच्यावर प्रतिहल्ला केला. ठाणे महापालिकेतील निवीदांमध्ये ४१ टक्क्य़ांचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप होऊ लागल्याने राज्य सरकारने चौकशीसाठी नंदलाल यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने सादर केलेल्या अहवालात राजन विचारे यांच्यावरही ठपका ठेवण्यात आला होता, त्यांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष मनोज प्रधान यांनी केला. नाईकांवर आरोप करणाऱ्या विजय नाहटा यांची शहापूर भागात २५० एकर जमीन असून त्याचे पुरावे सादर करणार असल्याचेही सांगण्यात आले. नाईक कुटुंबावर करण्यात आलेल्या आरोपाप्रकरणी अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यासाठी वकिली सल्ला घेण्यात येत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा