ती आली, तिच्याकडे पाहिले आणि पुन्हा मान वळवून पाहिले नाही, असे कुठेच घडले नाही. ओशिवऱ्याच्या हिरा पन्ना मॉलसमोर दुपारी एका वृत्तवाहिनीला नेहमीच्या फटाकडय़ा इश्टाइलमध्ये उत्तरे देत असलेल्या राखीला पाहण्यासाठी लोक खोदलेला रस्ता आणि तळपणाऱ्या सूर्याकडे दुर्लक्ष करत टाचा उंच करून रस्त्यावर उभे होते. ‘निवडणुकीत जिंकून आल्यावर पहिली गोष्ट काय करणार,’ या प्रश्नाला ‘२ जूनला दिल्लीत जाऊन शपथ घेणार’ असे उत्तर देऊन राखीने डोळे मिचकावत पाहिले आणि मुलाखतीचा ‘द एन्ड’ झाला, आणि सुरू झाला स्वयंघोषित राष्ट्रीय आम पक्षाची उमेदवार राखी सावंतचा प्रचार!
निवडणूक चिन्ह म्हणून मिळालेल्या मिरचीचा प्रचार व्हावा म्हणून पायातल्या शूजपासून डोक्यावरच्या टोपीपर्यंत हिरव्या रंगाच्या कपडय़ांनी नटलेल्या राखीचा फोटो सर्वत्र प्रसिद्ध झाला आहे. प्रचार यात्रेत मात्र तिने हिरव्या रंगाऐवजी काळ्या स्लॅक आणि जाकीटला पसंती दिली होती. कार्यकर्त्यांच्या दिशेने चालताना राखी दोन पावले मागे आली आणि बाजूला उभ्या असलेल्याला गाडीतून वडापाव आणून वाटायला सांगितले. कार्यकर्ते व त्यांच्यासोबत जमलेली चिल्लीपिल्ली हातात वडापाव खातच जशा येतील तशा घोषणा देत हनुमान नगरच्या गल्लीत निघाली. माणसे दिसतील तेथे राखी हात उंचावून मत द्यायला सांगत होती. ती पुढे गेल्यावर बायका एकमेकांकडे पाहू लागल्या. हनुमान नगरच्या बोळात राखीने पाऊल टाकले आणि घराघरातल्या बायकांना हात जोडून विनवणी सुरू झाली.
नुसतीच उतावळ्यांची गर्दी
इर्ला परिसरात पाणी येण्याची वेळ असल्याने बायका नळावर जमल्या होत्या. ‘आधी आमच्या पाण्याचे काहीतरी करा. पाणीच येत नाही,’ अशी तक्रार काहींनी सुरू केली. ‘मी तुमचे सर्व प्रश्न सोडवेन. तुम्ही फक्त मला मतदान करा,’ असे सांगत राखी पुढे निघाली. दुपारचा चहा पीत निवांत बसलेल्या बायकाही काहीतरी वेगळे म्हणून पटापटा दारात येत होत्या. ‘या गल्लीत कोणी फिरकलेले नाही. फक्त ही आली,’ असे एका बाईने सांगितले. मुख्य रस्त्यावर आल्यावर राखी काळ्या जीपमध्ये चढली. तेवढय़ात रिक्षामधून जाणाऱ्या तीन तरुण मुली राखीकडे पाहून किंचाळल्या. राखीने त्यांना हात दाखवला. रिक्षा पुढे जाऊन थांबली आणि तिघींनी पळत येऊन राखीसोबत फोटो काढून घेतले.
ढिम्म प्रतिसाद
टाटा कंपाऊंडच्या मार्गावर मात्र राखीला एकदम थंडा प्रतिसाद मिळाला. राखीने अनेकदा हात हलवून पाहिला. तिच्यासोबत असलेल्या पक्षाच्या अध्यक्षांनी लोकांना प्रतिसाद देण्याची विनंती केली पण सारे ढिम्म होते. एवढय़ात काही तरुणींनी तिसऱ्या मजल्यावरून हात हलवला. त्याच क्षणी राखीने जीपमधून खाली उडी मारली आणि धावत त्यांच्या दिशेने निघाली. इमारतीच्या खाली उभी राहून राखीने मतदानाचे आवाहन केले व तेथून लगबगीने रवाना झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा